बुलढाणा : मोठ्या दिराने आपल्या विधवा भावजयीचे नुसते लग्नच जुळविले नाही तर पित्याची भूमिका वठवीत तिचे ‘कन्यादान’ देखील केले. विशेष म्हणजे, दोन मुलींची आई असलेल्या विधवेशी लग्न करणाऱ्या युवकाचे हे पहिलेच लग्न होय. त्यामुळे या सामाजिक क्रांतीत वर पक्षाने देखील महत्वाची भूमिका वठविली, हे येथे उल्लेखनीय. बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील वसंत निकम यांनी हा सामाजिक आदर्श उभा केला.
थाटात पार पडले लग्न
भावाच्या निधनानंतर विधवा झालेल्या वहिनीसाठी वसंत निकम या दिराने पित्याची भूमिका घेतली. विधवा विवाहसाठी लोकचळवळ उभारणारे मानस फाऊडेशनचे दत्तात्रय लहाने यांच्या माध्यमातून कुटुंबाची मानसिकताही तयार केली. तसेच मुलीच्या आई-वडिलांनाही विश्वासात घेतले. योग्य अनुरूप जोडीदार शोधून थाटामाटात लग्नही लावून दिले. स्थळ शोधण्यापासून सर्व सोपस्कार पार पाडले व शेवटी बाप म्हणून वहिनीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून कन्यादानही केले.
वसंत निकम यांचे लहाने बंधू विजय यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे कमी वयात त्यांच्या वहिनी संजना यांच्यावर वैधव्याचा डोंगर कोसळला. विजय – संजना यांना दोन मुली झाल्या. मात्र विजय यांच्या जाण्यामुळे संजना निकम यांचे आयुष्यच उदध्वस्त झाले. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत वसंतरावांनी पुढाकार घेत त्यांच्या पत्नी आशा यांच्या मदतीने विधवा वहिनी संजनासाठी स्थळ शोधण्याचा विचार केला. निकम यांनी लहाने यांना आपला विचार बोलून दाखविला.लहाने व वसंतराव निकम यांनी हा विवाह पार पाडला.
खामगाव जवळील मोहाडी येथे हा विवाह सोहळा पार पडला. नवरदेव सतीष परिहार (अमडापूर, तालुका चिखली )यांचे हे पहिले लग्न असून त्यांनी दोन मुलींनाही स्वीकारले. प्रा. शहीना पठाण डॉ. निकम, संजनाचे वडील सुखदेव भुसारी, आई द्वारकाबाई, सामाजिक कार्यकर्ते अनिल इंगळे, हिरालाल जैन, वानखेडे व शंकर भाऊ हे या अनोख्या विवाहाचे साक्षीदार ठरले. या सोहळ्यामध्ये सर्व सोपस्कार वसंतरावांनी पार पाडले.