बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आधारित विकासासाठी कटिबद्ध असून केंद्राच्या पुढाकाराने आतापर्यंत ८५ लाख महिला बचतगट स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार, वन मंत्री भुपेंद्र यादव यांनी दिली. केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आज आदिवासी बहुल बावनबीर ( ता संग्रामपूर) येथे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री यादव बोलत होते.
याप्रसंगी आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे उपस्थित होते. यावेळी मंत्री म्हणाले की, केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु केली आहे. देशातील गरिबी दूर होण्यासाठी शासनाचे पैसे खऱ्या अर्थाने गरीब माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा गावागावात नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : यवतमाळकर आरोग्यासाठी धावले, यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनमध्ये दोन हजारांवर धावपटुंचा सहभाग
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सन २०४७ पर्यंत मजबूत भारत बनवण्याचा संकल्प आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकापर्यंत आयुष्यमान, किसान क्रेडिट कार्ड, आदिवासी बांधवासाठीच्या योजना, जात प्रमाणपत्र योजनांचा लाभ पोहोचणे गरजेचे आहे. शासनाने प्रत्येक लाभ डिजिटल स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छोट्या वर्गासाठी विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून परंपरागत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री यादव यांनी सांगितले. यावेळी आमदार फुंडकर, श्वेता महाले व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमोल बनसोडे यांनी तर गटविकास अधिकारी एस. व्ही. देशमुख यांनी आभार मानले.