बुलढाणा : केंद्रीय कामगारमंत्री भुपेंद्र यादव यांनी आज, शनिवारी चिखली तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत विविध योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रसिद्धीरथ शासकीय योजनांबाबत जनजागृती करत आहे. आज १६ डिसेंबरला ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील पेठ (ता. चिखली) येथे दाखल झाली.
यावेळी यादव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सुखी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने आधुनिक तंत्रज्ञान आणि बी-बियाणे निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. यातून अन्नधान्य उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल. आधुनिक तंत्रज्ञान व योजनांच्या मदतीने युवकांना रोजगार देण्याचे काम करण्यात येत आहे. युवक व नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यादव यांनी केले. योजनांपासून वंचित लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते लाभ देण्यात आला.
हेही वाचा : “धारावीसाठी उद्धव ठाकरे यांचा मोर्चा हा फुसका बार आहे”, बावनकुळे यांची टीका
यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, आमदार आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे लाभार्थी व नागरिकांशी संवाद साधला.