बुलढाणा : लोकसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करणारी जाहिरात एसटी बसवर दिसताच शेलसुर (ता. चिखली) येथील काही गावकऱ्यांनी बस अडविली. चिखली आगार प्रमुखांना याबद्दल विचारणा करण्यात आली असता एका कंपनीने ही जाहिरात लावल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळ थांबल्यावर बसला जाऊ देण्यात आले.
आज चिखली आगाराची बस (क्रमांक एम एच ४० ,एक्यू ६२८१)ही डोंगरशेवली वरून चिखलीकडे जात असताना शेलसूरमध्ये ग्रामस्थांनी अडवली. बस वर महायुतीला मतदान करण्याचे आवाहन करणारे जाहिरात होती. त्यामुळे अनेकांनी त्यावर सवाल उपस्थित केला. सरकारी मालमत्तेवर राजकीय पक्षाची जाहिरात कशी? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला.
‘बसेसवर जाहिराती लावण्याचे आदेश’
काही उत्साही मंडळींनी थेट चिखली आगार प्रमुख यांच्याशी संपर्क करून विचारणा केली.आगार प्रमुखांनी सांगितले की, राज्यातील १००० बसेसवर जाहिराती लावण्याचे आदेश आहे. एका जाहिरात कंपनीला हे कंत्राट दिले असून त्यांनी या जाहिराती लावल्याचे ते म्हणाले.