बुलढाणा : समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाच्या कार्यकाळात देशाचा जीडीपी (विकास निर्देशांक ) २४ टक्के होता, असे विधान करून औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली, असा आरोप करीत चिखली येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या पुतळ्याचे दहन केले. हे आंदोलन शिवसेना (शिंदे गट ) चे उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, माजी तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, गोपी लहाने, कैलास भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले .
शिवसेनेच्या वतीने आमदार अबू आझमी यांना इशारा देण्यात आला की, अशा प्रकारच्या चुकीच्या विधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अपमान होऊ देणार नाही. या आंदोलनात शिवसेनेचे उपशहर प्रमुख विठ्ठल जगदाळे, विकी नकवाल, राका मेहेत्रे, रामभाऊ देशमुख, पंजाब जावळे, बाळू खरात, राहुल शेलकर, ज्ञानू डहाके, गणेश वाघमारे, शरद भिसे, बंडू नेमाने, गोपाल ठेंग, गजानन शेळके, नीलेश गवारगुरु, गौरव टिपारे आणि साहेबराव अंभोरे यांसह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.
शिवसेनेच्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. इतिहासाची मोडतोड छत्रपतींच्या इतिहासाचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशारा विलास घोलप, चिखली शिवसेना शहरप्रमुख यांनी यावेळी बोलताना दिला.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्यपूर्ण आणि न्यायप्रिय नेतृत्वामुळे देशात स्वराज्याची स्थापना झाली. मात्र, औरंगजेबासारख्या अत्याचारी शासकाला मोठे करण्याचे प्रयत्न समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी करत आहेत, हे अत्यंत निंदनीय आहे. औरंगजेबाच्या काळातील जीडीपीबाबत चुकीचे विधान करून इतिहासाची मोडतोड केली जात आहे, हे आम्ही सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्यासाठी अभिमानाचा आहे आणि त्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही.
शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ठामपणे हा विरोध व्यक्त केला आहे. आमदार अबू आझमी यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे, अन्यथा पुढेही तीव्र आंदोलन छेडले जाईल. छत्रपतींच्या इतिहासावर आघात करणाऱ्यांना शिवसेना कधीच माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया शहरप्रमुख विलास घोलप यांनी दिली.