बुलढाणा: सिंदखेडराजा तालुक्यातील गुंज येथील चौघा सुनांनी सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून सामाजिक क्रांतीचे मोठे पाऊल उचलले आहे. या सुनांसह त्यांना संमती देणाऱ्या तुपकर परिवाराचे परिसरात कौतुक होत आहे. चौघा गृहलक्ष्मीनी एका सामाजिक क्रांती प्रारंभ केला असून सर्व समाजासमोर स्त्री पुरुष समानतेचा एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

साखरखेर्डा नजीकच्या गुंज येथील शंकर सोनाजी तुपकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. यावेळी पुरोगामी विचारसरणीच्या तुपकर कुटूंबियांनी सामाजिकदृष्ट्या धाडसी निर्णय घेतला. पुरूषांना मान न देता सुन गोदावरी केशव तुपकर, सरस्वती संतोष तुपकर, रेखा विष्णू तुपकर, स्वाती विजय तुपकर ह्या सुनांनी खांदा देत सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा…बुलढाणा काँग्रेसला देण्याची मागणी योग्य, पण…

गुंज येथील पूर्वीपासूनच तुपकर घराणे पुरोगामी व सामाजिक सुधारकांना आदर्श समजणारे आहे. पाच वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर तुपकर यांच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यावेळीही त्यांनी सुनेच्या हातानेच सगळे सोपस्कार पार पाडले होते. त्यांचा आदर्श घेऊन तुपकर कुटूंबियांनी पुन्हा एकदा महिलांना ही संधी दिली. जिजाऊंच्या भूमीत सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा आदर्श जपला आहे.

Story img Loader