बुलढाणा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेगावात माध्यमांची काहीशी निराशाच केली. त्यांनी गजानन महाराजांच्या मंदिरात राजकीय प्रश्नांवर बोलण्यास विनम्र नकार दिला. राजकारणावर बोलण्याचे टाळून त्यांनी संभाव्य राजकीय वाद वा वादंग टाळण्याचे चातुर्य दाखविले. एका खाजगी कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीस आज शनिवारी दुपारी संतनगरी शेगावात दाखल झाले. गजानन महाराज मंदिराचे दर्शन घेऊन त्यांनी संस्थानचा सत्कार स्वीकारला. त्यानंतर दीर्घ कालावधीपासून त्यांची प्रतीक्षा करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाठले. मात्र उपमुख्यमंत्री राजकीय काहीच बोलले नाहीत.
हेही वाचा : फडणवीस पोहोचले शेगावात…. ‘श्रीं’च्या समाधीस्थळी नतमस्तक
ते म्हणाले की, शेगावात येण्याची संधी मिळाली ही आनंदाची बाब आहे. शेगाव व शिर्डीचे अनन्यसाधारण महत्व आहे. गजानन महाराज व साईबाबा यांनी गरिबांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे. त्यांची ही शिकवण महत्वाची आहे. यानंतर त्यांना माध्यमांनी वादग्रस्त नवाब मलिक प्रकरण, फडणवीस यांचे ‘ते’ पत्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मौन यांवर प्रश्न विचारले असता त्यांनी मंदिरात राजकीय प्रश्न नकोत, असे सांगून ते पुढील कार्यक्रमाला रवाना झाले.