बुलढाणा: दोन दिवसापूर्वी पोलिसाविरुद्ध आक्षेपार्ह विधान करणे शिंदे गटाचे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांना चांगलेच महागात पडले ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर तीव्र नाराजी व्यक्त केली, बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . आमदाराना आपल्या वादग्रस्त विधाननाबद्धल दिलगिरी व्यक्त करावी लागली. यावर कळस म्हणजे एकनाथ शिंदेनी त्यांच्या आभार सभेत आमदार गायकवाड यांचे कान टोचले, आणि ‘संजयराव जरा जपून’ असा तंबीवजा इशाराही दिला.यामुळे आजची( रविवार) बुलढाण्यातील आभार यात्रा नाट्यमय राजकीय घडामोडीनी गाजली. सभेनंतर ही अनेक दिवस याचे राजकीय पडसाद उमटत राहणार आहे

शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,२७ एप्रिलला बुलढाणा शहरात आले असताना या नाट्यमय वेगवान घडामोडी रंगल्या. एका मागोमाग घडणाऱ्या या घटनानी एरवी औपचारिकता असलेल्या या आभार सभेचा नूरच बदलला. बुलढाणा शहरातील मध्यवर्ती भागातील राजमाता जिजामाता व्यापार व क्रीडा संकुल परिसरात आभार सभा पार पडली.सभेला शिवसैनिक व नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली. सभा स्थळी उभारलेल्या शामि्यानातील वातावरण जास्त तापदायक राहणार नाही यासाठी आमदारानी दक्षता घेत तशी तुषार यंत्रणा बसविली. मात्र आमदारांच्या पोलिसांविषयीच्या वादग्रस्त विधानाने बाहेरचे वातावरण चांगलेच तापले. कार्यक्रमाच्या समारोपात एकनाथ शिंदे यांनी खडे बोल सुनावलेल्याने सभा तापलेल्या स्थितीतच संपली.

शिंदे म्हणाले…

आपल्या दीर्घ भाषणाच्या समारोपात यांनी एकनाथ शिंदे यांच्या कान टोचले. आमदार गायकवाड कामात वाघ आहे, पण ते भावनेच्या भरात वाहून जातात, शिवसेना हा शिस्त बद्ध पक्ष आहे. राज्याचे पोलीस दल हे शौर्य, त्यागाचे प्रतीक आहे. करोना, मुंबईवरील २६/११ चा हल्ला असो वा सण उत्सव असो पोलीस आपले, समाजाचे रक्षण करतात. यामुळे त्यांची प्रतिमा मलीन होणार नाही, खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्या. आमदारांच्या विधानाबद्धल मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. आपण सुद्धा आमदार गायकवाड यांना फोन करुन या विधानाबद्धल नाराजी बोलून दाखविली. एवढ्यावरच न थांबाता एकनाथ शिंदे यांनी थेट स्वर्गीय आनंद दिघे यांचा दाखला दिला. पोलिसांची कामे प्रथम करा, वर्दी चा सन्मान राखा असे दिघे साहेब म्हणायचे. त्यामुळे संजयराव जरा जपून असे सांगत तुमची काही अडचण असेल तर मला सांगा, निधी हवा तर सांगा, काही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. त्यामुळे सभेचा रागरंग एकदम बदलला.

सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव , राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, माजी आमदार शशिकांत खेडेकर, संजय रायमूलकर व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या साक्षीने हे नाट्य रंगले. यामुळे बुलढाण्यातील आभार यात्रा वेगळ्याच कारणाने गाजली…