बुलढाणा : जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असलेल्या लोणार येथील खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवर परिसरात ५ ते ६ पानकावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या पक्ष्यांचा मृत्यू नेमके कश्यामुळे झाला हे स्पष्ट झाले नसले तरी हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वन्यजीव विभागाने वर्तविला आहे आहे. व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूचे खरे कारण सांगता येईल असेही या सूत्रांनी सांगितले.

सरोवर नगरी लोणार मधील काही भाविक सरोवरातील देवी मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्यांना लगतच्या परिसरात काही पान कावळे मृतावस्थेत आढळून आले. या वन्य जीव प्रेमीनी याची माहिती वन्यजीव विभागाला दिली. विभागाने घटनास्थळी पंचनामा करून मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन केले. त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसला, तरी प्राथमिक तपासात उष्माघात मुळे या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अभ्यासक व अधिकारी काय म्हणतात?

राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरडे पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी पान कावळे हे मुख्यतः पानथळ जागी राहतात असे सांगितले.ब्लर्ड फ्लू, शिकारीचा प्रयत्न किंवा मानवी प्रदूषण त्यांचा मृत्यू होण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र , मृत पक्ष्यांचा व्हिसेरा तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. त्याचबरोबर, परिसरातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोणार सरोवर अभयारण्य वन परी क्षेत्राचे प्रभारी पवन जाधव म्हणाले की, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मृत पक्ष्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त नाही. मात्र, प्राथमिक स्तरावर या पान कावळ्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा अंदाज आहे, असे ते म्हणाले.