नागपूर : जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला लोणार शहरातील ‘लोणार सरोवर’ या जागतिक पर्यटन ठिकाणाला धुक्यांनी विळखा घातला. जागतिक आश्चर्यांपैकी एक असलेल्या लोणार सरोवराला धुक्याच्या चादरीने गुंडाळल्याची वार्ता पसरताच पर्यटकांची पावले आपोआप सरोवराकडे वळू लागली. एरवी महाबळेश्वर, चिखलदरा याठिकाणीच हे असे दृश्य पहायला मिळते. मात्र, या जागतिक आश्चर्याला धुक्याने कवटाळल्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. ‘मी लोणारकर’ समूहाचे सदस्य सचिन कापुरे यांनी हे दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले.
‘मी लोणारकर’ कोण ..?
लोणार शहरातील काही शासकीय, अशासकीय अधिकारी तसेच व्यावसायिक, शहरातील व्यक्ती यांनी काही वर्षांपूर्वी लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ‘मी लोणारकर’ हा समूह स्थापन केला. या समूहातील सदस्य प्रत्येक शनिवार, रविवारी एकत्र येऊन लोणार सरोवर परिसराची स्वच्छता करतात. एवढेच नाही तर या सरोवराच्या संवर्धनासाठी त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. सरोवराची लोप पावत चाललेली ओळख त्यांच्यामुळेच परत येऊ लागली, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही.
हेही वाचा : नागपुरातील समलैंगिकांचा ‘सारथी’ हरपला
लोणार सरोवराचे वैशिष्ट्य
लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले बेसाल्ट खडकातील आशिया खंडातील पहिले आणि जगातील तिसरे सरोवर आहे. उल्कापातामुळे निर्मित लोणार विवर हे जसे जागतिक आश्चर्य आहे, तसेच या विवराच्या तळाशी निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर हेही एक आश्चर्य आहे. या पाण्याचा पीएच हा १०.५ इतका जास्त असल्याने शेवाळवर्गीय वनस्पती वगळता यात कोणताही सजीव प्राणी जगण्याची शक्यता नाही. मात्र, अलीकडच्या काही वर्षात त्याचे पाणी वाढत आहे.
लोणार सरोवराचा समृद्ध परिसर
लोणार विवराच्या बाजूला असणारे जीवंत झरे, गायमुख धार, ब्रम्हकुंड, पापहरेश्वर, सीतान्हानी आणि रामगयामुळे प्राचीन काळी पंचाप्सर अशी याची ओळख होती. विवराच्या काठावर असणाऱ्या अकराव्या-बाराव्या शतकातील मंदिरांपैकी बगिचा महादेव मंदिर, अंबरखाना महादेव मंदिर, मोर महादेव मंदिर आहे.
जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला लोणार शहरातील ‘लोणार सरोवर’ या जागतिक पर्यटन ठिकाणाला धुक्यांनी विळखा घातला. ‘मी लोणारकर’ समूहाचे सदस्य सचिन कापुरे यांनी हे दृश्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. pic.twitter.com/mVO2Hc3XgR
— LoksattaLive (@LoksattaLive) September 27, 2024
तसेच सरोवराच्या काठावर ११-१२व्या शतकातील मंदिरे आहेत. सरोवराभोवती पाच बारमाही प्रवाहित असणारे जिवंत झरे आहेत. गायमुख धार, ब्रह्मकुंड, पापहरेश्वर, सितान्हानी आणि रामगया हे ते झरे आहेत.
लोणार सरोवराचे पाण्याचा रंगबदल
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य म्हणून ओळखले जाते. त्यातील पाण्याचा रंग काही वर्षांपूर्वी बदलला. निळे व हिरवे दिसणारे सरोवरातील पाणी लाल दिसू लागले. लोणार सरोवरात हॅलोबॅक्टेरिया आणि ड्युनोलिला सलीना नावाच्या कवका बुरशीची खाऱ्या पाण्यात मोठी वाढ झाल्यामुळे पाण्याचा रंग लाल झाला असावा, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला. वातावरणातील बदल, सरोवरात पाण्याची कमी झालेली पातळी, या प्रकारातूनही रंग बदलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.