लोकसत्ता टीम
बुलढाणा: अवैध रेती तस्करीला प्रतिबंध लावण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली असून कडक उपाय योजनांमुळे या गोरखधंद्याला चाप बसला आहे. याचाच एक भाग म्हणून विशिष्ट वाहनांना इंधन विक्री न करण्याचे व थारा न देण्याचे आदेश देऊळगाव राजा तहसिलदारांनी काढले आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सुस्तावलेल्या यंत्रणांना अवैध रेती उत्खणन व वाहतुकीला प्रतिबंध करण्यासाठी कामाला लावले आहे. देऊळगाव राजा तालुका रेती तस्करीचे मोठे केंद्र आहे. तालुक्यातील डिग्रस, देऊळगाव मही, नारायणखेड, निमगाव गुरु परिसर तस्करांचे कार्यक्षेत्र आहे. दरम्यान, अवैध वाहतुकीसाठी विनाक्रमांकाच्या वाहनांचा वापर तस्कराकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे देऊळगाव राजाचे तहसीलदार श्याम घनमने यांनी विना क्रमांकाच्या अशा वाहनांना पेट्रोलपंप धारकांनी इंधन पुरवठा करू नये, असे आदेश दिले आहे.
हेही वाचा… “भाजप सत्तेत आल्यानंतरच जातीय दंगलीत वाढ”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप, म्हणाले…
तालुक्यातील ७ पंपाच्या व्यवस्थापकाना तसे लेखी पत्र देण्यात आले आहे. यामध्ये देऊळगाव राजा येथील गजानन, कोटकर, सोन सर्वो, पदमबुद्धि पेट्रोल पंप, देऊळगाव मही येथील सागर पंप, अंढेरा फाटा येथील शहीद रामदास व असोला फाटा येथील शिवप्रयाग पेट्रोल पंपांचा समावेश आहे. अशा वाहनांना पंप परिसरात थांबू न देण्याची सूचनाही पंपाना देण्यात आली आहे.