बुलढाणा : काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला १३८ वर्षे पूर्ण झाली आहे. याप्रित्यर्थ पक्षाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना १३८ रुपये पक्षनिधी देण्याचे आवाहन केले आहे. बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षस्थापना दिनानिमित्त पक्षनिधी उभारण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा कार्यलयात नागपूर येथील नियोजित ‘है तयार हम’ रॅली विषयक बैठक पार पडली. या बैठकीत पक्षनिधी उभारण्याचेही नियोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी १ लाख ३८ हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यांनी सर्वप्रथम निधी संकलनाची सुरूवात केली. जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मिलींद जैस्वाल व परिवहन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद ईरफान यांनी प्रत्येकी १३ हजार ८०० रुपये रोख स्वरूपात दिले. सदर धनादेश व रोख रक्कम जिल्हा सरटिणीस (प्रशासन) सतिष मेहेंद्रे यांच्या सुपूर्द करण्यात आली.
हेही वाचा : दुग्ध उत्पादनाच्या विकासावर भर, अकोला जिल्ह्यासाठी ४७१६ कोटींचा ‘पीएलपी’ आराखडा
दरम्यान, बैठकीत बोलताना बोन्द्रे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी नागपुरमध्ये आयोजित काँग्रेस पक्षाच्या “है तैयार हम” महारॅली ची माहितीही दिली. महारॅलीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, प्रदेश अध्यक्ष नानाभाउ पटोले, विविध राज्याचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक लक्ष्मण घुमरे , संचालन गणेश पाटील तर आभार विजयसिंह राजपूत यांनी मानले .