बुलढाणा : जलंब ते माटरगाव ही विद्यार्थ्यांनी भरलेली एसटी बस अचानक बंद पडली. वाहक व चालकाला विचारले असता, ‘गाडी गरम झाल्याने बंद पडली’ असे उत्तर त्यांनी दिले. त्यांच्याकडे पाण्याची सोय नव्हतीच. मग काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या बॅग मधील सर्व बॉटल बाहेर काढून आहे तितके पाणी बोनेट उघडून इंजिनवर टाकले. मात्र त्याने ‘रुसलेली लालपरी’ काही सुरू होईना. मग यावरही तोडगा काढण्यात आला.
हेही वाचा : आरोग्य उपसंचालक न्यायालयात ‘हाजिर हो…’ वाचा काय आहे प्रकरण?
रस्त्याजवळच्या विहिरीतील पाणी बॉटलमध्ये भरून आणले व बसला थंड केले. या जलसेवेनंतर बस धावू लागली आणि विद्यार्थी आपल्या गावी पोहोचले. उबाठा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश देशमुख यांनी या घटनेबद्धल संताप व्यक्त केला. त्यांनी याची तक्रार आगार प्रमुख यांच्याकडे केली आहे. लोकप्रतिनिधी करतात तरी काय? विहिरीतून पाणी काढताना एखाद्याचा जीव गेला असता तर त्याला कोण जबाबदार असता, असा सवालही त्यांनी केला.