लोकसत्ता टीम
बुलढाणा: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या घोषणेचे तीव्र पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले आहे. जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून जिल्ह्यात ठिकठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘साहेब राजीनामा मागे घ्या’ च्या घोषणा दिल्या आहे.
राज्यासह देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असताना व विरोधक एकवटत असताना मुंबई येथे शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली. याचे पडसाद बुलढाण्यात लगेच उमटले. जिल्ह्याबाहेर प्रवासात असतानाच जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा पाठविला. आमचे सर्वस्व असलेल्या साहेबांचा हा निर्णय जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक, वेदनादायक व क्लेशदायक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, क्रियाशील सदस्य राजीनामे देणार आहे. निर्णय मागे घेतला नाही तर प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामे देणार असल्याचे ऍड. काझी म्हणाले.
दरम्यान, प्रक्षुब्ध कार्यकर्ते जिल्ह्यात रस्त्यावर उतरले. ‘मागे घ्या, राजीनामा मागे घ्या, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार’ अशा घोषणांनी जिल्हा दुमदुमला. बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने, विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके, शहराध्यक्ष अनिल बावस्कर, महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे, जिल्हा सरचिटणीस अनिल वर्मा, सत्तार कुरेशी, माजी नगरसेवक बबलू शेळके यांनी घोषणा दिल्या.