बुलढाणा: गारपीट, वादळासह झालेल्या अवकाळी पावसाने राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत भरपाईबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आपण यावर हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचेही त्यानी सांगितले.
सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का व अन्य गावातील, पीक, शेडनेट, भाजीपाला नुकसानीची अंबादास दानवे यांनी आज बुधवारी पाहणी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पदाधिकारी, शिवसैनिक सोबत होते.
हेही वाचा : शिक्षणाचा बाजार! वाशीम जिल्ह्यात अनधिकृत शाळा, विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले; शिक्षण विभागाने…
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनामार्फत तत्काळ मदत होणे आवश्यक आहे. आज होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत या नुकसानीबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी दानवे यांनी केली. राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली.