बुलढाणा : जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण वाढले असतानाच अशाच एका घटनेत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बुलढाणा-खामगाव राज्य महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यात ही दुर्देवी घटना घडली. बाजीराव चौहान ( ६०, रा. माटरगांव ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते मंगळवारी दुपारी अभयारण्यातील माटरगांव धरण शिवारात हरवलेली गुरे शोधण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून जवळपास १०० मीटर दूर दाट झुडुपात फरफटत नेले. यामुळे बाजीराव यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : युवक काँग्रेसच्या आंदोलनावरून नागपूरमध्ये पक्षांतर्गत बेकीचे दर्शन
नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी फायर-लाईनचे काम करण्यासाठी गेले असता त्यांना वृद्ध शेतकऱ्याचा मृतदेह आढळला. वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी लोखंडे (खामगाव ) व चेतन राठोड ( बुलढाणा) यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे माटरगांव धरण शिवार परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे.