बुलढाणा : चिखली तालुक्याची आजची सकाळ खळबळजनक आणि तितकीच गंभीर बातमी घेऊन आली! यामुळे भीषण दुर्देवी घटनेचे साक्षीदार ठरलेले शेलोडी हे गाव सुन्न झाले असून संपूर्ण चिखली तालुका हादरला आहे. घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरताच बुलढाणा जिल्ह्यातही हळहळ व्यक्त होत आहे.

चिखली तालुक्यातील शेलोडी येथे ही भीषण घटनाक्रम घडला आहे. जुनाट घराचा धाबा ( छत ) कोसळून त्या ढिगाऱ्याखाली दबून बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी ,१७ मार्च रोजी सकाळी ही खळबळजनक घटना घडली. या घटनेचा विस्तृत तपशील येथे अजून प्राप्त झाला नाही. मात्र प्राप्त प्राथमिक माहितीनुसार शेलोडी येथील दामोदर घाडगे यांनी जुने माळदाचे (धाब्याचे ) घर पाडून नवे घर बांधायचे ठरविले .जुन्या काळात सागवान ची मोठ्या आकाराची लाकडे आणि पांढरी माती ( वा चुनखडी?) वापरून या घराचे छत (धाबा ) तयार करण्यात येत असत. हे जुने घर पाडून नवीन घर बांधवयाचे असल्याने दामोदर घाडगे यांनी माळूद पाडण्याचे काम गावातीलच शालिग्राम वाळूस्कर यांना ठोक पद्धतीने दिले होते.

दरम्यान कडक उन्हामुळे आज सोमवारी ,१७ मार्चच्या सकाळीच शालिग्राम वाळूस्कर त्यांचा मुलगा योगेश , राम घाडगे, सुनील नेमाने यांनी माळूद पाडण्याचे काम सुरु केले होते.. मात्र दुर्दैवाने जीर्ण झालेले माळूद (छत ) जुन्या लाकडांसह मजुरांच्या अंगावर कोसळले. यात शालिग्राम वाळूस्कर (६५) आणि त्याचा मुलगा योगेश वाळूस्कर(३२) यांचा मलब्याखाली दबून भीषण मृत्यू झाला. तसेच मजूर राम घाडगे आणि सुनील नेमाने हे दोघे गंभीर जखमी झाले. काहीतरी कोसळल्याचा जोरदार आवाज झाल्याने गावकऱ्यांनी घाडगे यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी चौघाना ढिगाऱ्या खालून कसेबसे बाहेर काढले. दोघां जखमीना चिखली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार साठी भरती करण्यात आले आहे . त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दोघांच्या दुर्दैवी मृत्यूने शेलोडी गावात शोक कळा पसरली असून चिखली तालुक्यात खळबळ उडाली आहे.