बुलढाणा : मलकापूरनजीकच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अपघातात पुत्र जागीच ठार तर वडील गंभीर जखमी झाले. आज धरणगावनजीक ही दुर्दैवी घटना घडली. तालासवाडा येथील सुपडा श्रीहरी घाईट (५४ ) व त्यांचा मुलगा अजय सुपडा घाईट (२२ ) हे दोघेजण एम एच २८ बीपी ८७५४ या दुचाकीने तालासवाड्यावरून मलकापूरकडे येत होते.
दरम्यान खोदकाम केलेल्या रस्त्यामुळे त्यांची दुचाकी स्लिप होऊन थेट रस्तादुभाजकाला धडकली. यात अजय घाईट हा जागीच ठार झाला तर त्याचे वडील सुपडा घाईट गंभीररित्या जखमी झाले. नागरिकांनी खाजगी वाहनाद्वारे जखमी सुपडा घाईट यांना उपचारार्थ मलकापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा…नववधू पतीची दारात वाट पहात होती, मात्र घरी आले…
मागील वर्षीच या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. या रस्त्याचे लोकार्पणही जवळपास चार महिने आधीच संपन्न झाले. अशा परिस्थितीत देखभाल दुरुस्तींतर्गत जिथे रस्ता निकृष्ट दर्जाचा बनला आहे तो भाग काढून टाकण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सद्यस्थितीत सुरू आहे. असेच काम धरणगावजवळ करण्यात आले होते.