बुलढाणा : एरवी शासकीय अधिकारी, कर्मचारी हे ग्रामस्थ किंवा जन सामान्यासोबत साहेबगिरीच्या अविर्भावात वागतात. त्यांचा पाणउतारा करतात, टोचून कडक बोलतात असा सर्वांचा अनुभव आहे. अगदी कुणी अन्यायाविरुद्ध आंदोलन केले तरी तिकडे लवकर ते ढुंकूनही पाहत नाही, असे परिस्थिती सगळीकडे आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील एका महिला सरपंचांनी असा काही ‘आंदोनात्मक हिसका’ दाखविला की ‘साहेब’ थेट आंदोलनाच्या दारी आले.
आज बुधवारी (२ ऑक्टोबर) हे अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू झाल्यावर काही तासांतच साहेब दूरवरच्या आंदोलनस्थळी धावत आले आणि महिला सरपंच आणि गावकऱ्यांची मागणी तत्काळ मार्गी लावली. सुवर्णा गणेश टापरे असे या महिला रणरागिणीचे नाव असून त्या आदिवासी बहुल आणि विकासापासून वंचित संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव पिंपरी या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यांनी आपले सहकारी उपसरपंच, सदस्य यांच्या समवेत आज, अहिंसक आंदोलनाचे प्रणेते, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर स्वतःसह आपल्या सहकाऱ्यांना जमिनीत अर्धे गाडून घेतले. त्यांचा आणि गावकऱ्यांचा संताप अनावर व्हायला कारणही तसेच आहे.
हेही वाचा : नागपूर : वंदे भारत एक्सप्रेस रद्द! रेल्वेचा निर्णय काय जाणून घ्या…
मागील वर्षी २०२३ मधील सव्वीस, सत्तावीस फेब्रुवारी रोजी झालेल्या अतिवृष्टी व गारपोटीमुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये काथरगाव पिंपरी येथील सर्वसामान्य, अल्पभूधारक महिला, पुरुष शेतकऱ्यांचाही समावेश होता. या नैसर्गिक तांडवाला दीड वर्षाचा कालावधी लोटला, मात्र गावातील बाधित शेतकऱ्यांना त्याची अध्यपाही नुकसान भरपाई मिळालेली नाही. आजवरच्या काळात फक्त फसवी आश्वासनच मिळाली. कवडीची देखील आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही.
संयमाचा बांध फुटला
यंदाचा खरीप हंगाम देखील पावसाच्या मनमानी आणि लहरीपणामुळे धोक्यात आहे. कपाशी आणि सोयाबीन या मुख्य पिकांच्या उत्पादनात घट येणार हे आत्ताच स्पष्ट झाले आहे. यामुळे गावकरी, शेतकरी हवालदिल झाले आहे. नुकसान भरपाईसाठी वेळोवेळी तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांना निवेदन, तक्रार अर्ज, स्मरण पत्र देऊनही काहीच फायदा झाला नाही. यामुळे बाधित शेतकऱ्यांनी सरपंच सुवर्णा गणेश टापरे, उपसरपंच आणि सदस्यांना ,’ताई काही तुम्हीच काही हालचाल करा’ असे साकडे घातले. यामुळे सरपंचांनी रणरागिणीचे रूप धारण केले. त्यांनी गावजवळच एका गड्ड्यात स्वतःला अर्धवट गाडून घेतले. यात काही शेतकरी देखील सहभागी झाले. घोषणा देणाऱ्या ग्राम पंचायत सदस्या, सरपंच,जमा झालेले गावकरी असा या अभिनव ‘भूमिगत’ आंदोलन होते.
हेही वाचा : “महात्मा फुलेंनी लिहिलेल्या ओळी या सरकारने बदलल्या”, वडेट्टीवारांकडून पुराव्यासह…
तहसीलदार गड्ड्याकडे
या अनोख्या आंदोलनाची माहिती गाव परिसरातच नव्हे तर तालुक्यात पसरली. समाजमाध्यमांवर वेगाने ‘व्हायरल’ झाल्याने तालुक्यात आंदोलनाची बातमी पसरली. ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही पोहोचली. ‘लाडकी बहीण’च्या शुभ पर्वात महिला खड्ड्यात बसणे काही परवडणारे नव्हते याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे आज गांधी जयंतीची शासकीय सुट्टी असूनही संग्रामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यासह काथरगाव पिंपरी गावात दाखल झाले. तहसीलदार पाटील यांनी भूमिगत आंदोलन करणाऱ्या सरपंच सुवर्णा गणेश टापरे आणि अन्य आंदोलकाना तात्काळ लेखी पत्र देऊन तातडीने कारवाईची लेखी ग्वाही दिली. यानंतर सर्व लाडक्या बहिणी आणि शेतकरी गड्ड्यातून बाहेर पडले. त्यांनी भूमिगत आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.