बुलढाणा : मोताळानंतर आता मलकापूर तालुक्यातही गांजाची शेती आढळली. याठिकाणी टाकलेल्या छाप्यात लाखोंचा कच्चा गांजा जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली येथील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले होते. त्या पाठोपाठ मलकापूर तालुक्यातील हिंगणा काझी शिवारातील गट क्रमांक ५२ मधील शेतात गांजाची तब्बल ७३ झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले. मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा : सीईओंनी घेतली पाच कर्मचाऱ्यांची ‘विकेट’!
या शिवारात आरोपी सुभाष भागवत पाखरे ( ३३, राहणार भालेगाव, तालुका मलकापूर) याने अतिक्रमण करून शेती केली आहे. त्यामध्ये लावण्यात आलेल्या गहू, कपाशी व तुरीच्या पिकात या बहाद्दराने गांजाची ७३ झाडे लावल्याचे तपासात आढळून आले. १८५.७७ किलो वजनाच्या या ओलसर गांजाची किंमत १८ लाख ५७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणी आरोपी शेतकरी पाखरे विरुद्ध अंमली पदार्थ कायद्याच्या कलम २० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.