बुलढाणा : महायुती महाराष्ट्र राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकणार असून त्यात बुलढाण्याचाही समावेश असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केला. मात्र, त्यांनी बुलढाण्यातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांवर केलेली टीका, त्यावर भाष्य करताना घेतलेला वेळ, माध्यम प्रतिनिधींनाही चक्रावून टाकणारा ठरला. बुलढाण्यात प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आलेले सामंत यांनी स्थानिक पत्रकार भवनात माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रात ‘चारशे पार’ तर राज्यात ‘४५ पार’ असे भाकित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत केलेली दमदार कामगिरी, देशाचा चौफेर विकास, जगात देशाची उंचावलेली मान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झालेला विकास यामुळे महायुतीला हे घवघवीत यश मिळणार आहे. बुलढाणा मतदारसंघातही प्रतापराव जाधव बहुमताने निवडून येतील, असा दावाही त्यांनी बोलून दाखविला.
हेही वाचा : नागपूर : भाजप आमदाराच्या भगिनीचेच नाव मतदार यादीतून वगळले
यानंतर सामंत अनपेक्षितरित्या अपक्ष उमेदवार तुपकर यांच्यावर घसरले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांसंदभात आंदोलन करायची आणी न्याय मिळाला की तो माझ्यामुळेच मिळाला असे भासवायचे, असा प्रकार बुलढाणा मतदारसंघात सर्रास सुरू आहे. बियाणे कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये उकळण्याचे धंदे सुरू असल्याचे ते म्हणाले. दादागिरीने पैसे उकळायचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी तुपकर यांचा नामोल्लेख न करता केला. प्रतापराव जाधव यांच्या विरोधात निवडणुकीत असा शेतकरी नेता उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर नावाची माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी तुपकरांचा उल्लेख केला. बुलढाणा मतदारसंघात जाधवांची लढत आघाडी की तुपकर यापैकी कुणासोबत आहे? असे विचारले असता, त्यांनी जाधव यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. दुसऱ्या क्रमाकासाठी अपक्ष रविकांत तुपकर आणि आघाडीचे नरेंद्र तुपकर यांच्यात लढत असल्याचे ते म्हणाले.