बुलढाणा: बुलढाण्यात पार पडलेली जिल्हा गुंतवणूक परिषद फलदायी ठरली! या परिषदेत ४५ उद्योजकांसोबत १ हजार १५० कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहे. मलकापूर मार्गावरील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने ही परिषद पार पडली.यावेळी उद्योजक राधेश्याम चांडक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण आहेत. विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात ‘सिंगल विंडो’ प्रणाली सुरूवात करण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यात गुंतवणूक वाढीसाठी मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. औद्योगिक परिसरात जागा देण्यापासून उत्पादनाचे ‘मार्केटींग’ आणि ‘ब्रँडींग’साठी राज्य शासनाकडून मदत देण्यात येत आहे. जिल्ह्यात सुपीक जमीन असून प्रामुख्याने कृषि आधारीत उद्योग उभारण्यास संधी आहे. कृषि उत्पादनांबाबत मुल्यवर्धन साखळी निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. जिल्हा पातळीवर तयार झालेल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास ही उत्पादने जागतिक स्तरावरही जातील. जिल्ह्यातील बचतगटांसाठी राजमाता या ब्रँडची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वैश्विक ओळख मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातून गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्यात होत आहे. गेल्या वर्षी सुमारे ७५० कोटी रूपयांची उत्पादनांची निर्यात झाली. उद्योग उभारणी आणि निर्यातक्षम उद्योग उभारणीसाठी नवउद्योजकांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात समृद्धी महामार्ग, शक्तीपिठ जोडणारा मार्ग यामुळे उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू दूरच्या ठिकाणावर कमी वेळेत पोहोचणे शक्य झाले आहे. वाहतूक क्षेत्रातील उद्योजकांनी या पायाभूत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा : Video: वाघिणीला तहान लागली; मग तिने असे काही केले की…
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योजकांसाठी २२ योजना राबविण्यात येतात. यातील अनुदान, मदत, कर्ज परतफेड, व्याज सवलती आदी योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आठ औद्योगिक क्षेत्रात १ हजार १८१ उद्योजकांना भूखंड वाटप करण्यात आले आहेत. बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांनी उद्योजकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या. पोटे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती दिली. इंगळे यांनी बचतगटांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. इश्वेद बायोटेकचे संजय वायळ यांनी उद्योगाविषयी माहिती दिली. सुनील पाटील यांनी उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली.