बुलढाणा : जिल्ह्यात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज अंगावर कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला. तसेच आंब्याच्या मोहोरासह रब्बी पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत किरकोळ अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही तालुक्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची नोंद झाली. शेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १२ मिलीमिटर पावसाने हजेरी लावली.
हेही वाचा : अॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा १८ फेब्रुवारीलाच का ? जाणून घ्या या दिवसाचे ऐतिहासिक महत्व
दरम्यान गुरुवारी रात्री ९.३० वाजता अंगावर विजेचा लोळ कोसळून सुरज सुभाष निंबाळकर ( रा. टाकळी हाट, ता. शेगाव) यांचा मृत्यू झाला. खामगाव मार्गावरील जयपूर लांडे फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. याचा अहवाल शेगाव तहसीलदार यांनी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी यांना सादर केला. अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे बहरलेला आंब्याचा मोहोर गळाला आहे. याशिवाय ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांचे नुकसान झाले. याशिवाय सोंगून ठेवलेल्या पिकांची नासाडी झाली.