बुलढाणा : राज्यातील सर्व मराठा बांधव एकच असून कुणबी आणि मराठा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समस्त मराठा बांधवानी एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. लोणार तालुक्यातील शिंदी येथे छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट आणि शिवप्रेमींच्या संयुक्त पुढाकारराने शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या आकर्षक पुतळ्याचे अनावरण मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे आवाहन केले. सभेला शिंदी गावासह पंचक्रोशीतील गावाकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. व्यासपीठावर शिवाजी राजे जाधव, शिवसेना (शिंदे गट) बळीराम मापारी, युवा सेना जिल्हा प्रमुख हृषीकेश जाधव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) उपजिल्हा प्रमुख आशीष रहाटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विनोद वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या विशिष्ट शैलीतील भाषणात पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी सामाजिक ऐक्यावर भर दिला. मराठा आणि कुणबी एकच असून जो लढाया करतो तो क्षत्रिय मराठा आणि जो शेती करतो तो कुणबी. ते एकच आहेत. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, कोकण, मराठवाडा मधील मराठे एकच असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. जातीवाद निर्माण करण्यासाठी नव्हे तर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांच्या आरक्षणसाठी मराठ्यांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. तुम्ही मराठा, कुणबी असा भेदाभेद करू नका, एकमेकांच्या सुख- दुख्खात सहभागी व्हा, कुणी तुमच्यावर अन्याय केला तर सहन करू नका पण दुसऱ्यावर देखील अन्याय करू नका असा उपदेश त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित मराठा समाज बांधवाना केला. यावेळी रमेश मुळे, भागवत बोडखे, अंबादास खंड, नाना खंदारे, संजीवनी वाघ, दत्ता पाटील, भगवान सुलताने, रवी बोडखे, राहुल काबरा यांच्यासह पंच क्रोशीतील गावकरी बहू संख्येने हजर होते.

Story img Loader