बुलढाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात पुन्हा एका सामाजिक क्रांती व ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती होणार आहे. सात वर्षांनंतर बुलढाण्यात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन होणार आहे. फरक एवढाच की यंदाचे वादळ ‘मूक’ राहणार नाही. जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमारच्या निषेधार्थ व आरक्षणाच्या मागणी साठी १३ सप्टेंबर रोजी विशाल मराठा मोर्चा आयोजित करण्यात आला आला आहे. स्थानिय गर्दे वाचनालय सभागृह येथे पार पडलेल्या सामाजिक कार्यकर्ते व समाजधुरीणांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यानिमित्त जिल्हातील समाज बांधव एकवटले होते. सामाजिक लढा संघटितपणेच लढावा लागेल असा या बैठकीचा सूर होता. बैठकीमध्ये मोर्चाचे प्राथमिक नियोजन ठरले. त्यासाठी जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधून जिल्हा समन्वयक तर प्रत्येक तालुक्यातून पाच तालुका समन्वयक घेण्याचं ठरलं. या सर्वांच्या समन्वयातून मोर्चा कसा यशस्वी होईल यावर विचार विनिमय करण्यात आला.
हेही वाचा : नेत्याचा फोन अन् पोळ्याची सुटी पाड्व्याला, काय नेमके घडले?
संहिता ठरली
बैठकीत मोर्चाची संहिता निर्धारित करण्यात आली. तसेच संभाव्य घोषवाक्य, मोर्चाची सुरुवात, नेतृत्व आदी विषयावर चर्चा करण्यात आली. सात वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या ऐतिहासिक मोर्चापेक्षाही हा मोर्चा विराट असणार असला तरी तो ‘मूक’ नसणार आहे. मोर्च्याची पुढील दिशा व वाटचाल वेळोवेळी माध्यमांना कळविण्यात येईल असे समन्वयक समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.