बुलढाणा : चेन्नई आणि दिल्ली येथील वैद्यकीय तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ आज टक्कलग्रस्त शेगाव तालुक्यात डेरेदाखल झाले. केसगळती व टक्कल आजारावर संशोधन करण्याच्या उद्देशाने आलेल्या या पथकात आयुर्वेद, होमीओपॅथी, युनानी आणि ॲलोपॅथी या चारही शाखांच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. तज्ज्ञानी टक्कलग्रस्त गावातील रुगणांशी संवाद साधून माहिती संकलीत करण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)च्या दिल्ली आणि चेन्नई येथील शास्त्रज्ञांचा समावेश आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगांव, बोंडगाव, यांसह ११ गांवामध्ये नागरिकांची केसगळती होऊन टक्कल पडत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावांतील नागरिक भयभित झाले. दरम्यान, केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाच्यावतीने आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली. ११ जानेवारीला जाधव यांनी या गावांना भेट देऊन बाधितांना धीर दिला. तसेच या विचित्र आजाराच्या संशोधनासाठी दिल्ली आणि चेन्नई येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला शेगावमध्ये दाखल होण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद दिल्ली आणि चेन्नईचे पथक शेगाव येथे दाखल झाले.

हेही वाचा : अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…

रोग निदानाच्या कामास प्रारंभ

शास्त्रज्ञांनी बुलढाणा जिल्ह्यातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर या पथकांतील शास्त्रज्ञांनी केसगळतीग्रस्त भागातील बाधित रुग्णांशी संवाद साधून हा प्रकार कशामुळे उद्भवला, त्याचे मूळ आणि प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने काम सुरू केले. या विशेष पथकामध्ये डॉ.मनोज मुऱ्हेकर (चेन्नई), डॉ. सोमेश गुप्ता (एम्स, नवी दिल्ली), डॉ. सुमित अग्रवाल (नवी दिल्ली), डॉ. शीला गोडबोले (पुणे), डॉ राज तिवारी (भोपाळ) , डॉ. सुचित कांबळे (पुणे) यांचा समावेश आहे. सोमवारी आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्था नवी दिल्ली आणि केंद्रीय होमीओ परिषदेच्या शास्त्रज्ञांची चमू शेगाव तालुक्यात दाखल झाली. यामध्ये युनानी होमीओपॅथी आणि आयुर्वेदीक तज्ज्ञांचा समावेश आहे. डॉ. हिंकल कौर, डॉ. प्रियंका सुर्यवंशी, डॉ. तेजस्वीनी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केसगळती गावांतील रुग्णांशी चर्चा करून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि ॲलोपॅथीचे शास्त्रज्ञ केसगळती प्रकारणच्या मुळाशी जाऊन हा प्रकार कशामुळे उद्भवला हे शोधण्याचे काम करीत आहे.

हेही वाचा : नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…

रुग्णसंख्या १७१ वर

तज्ज्ञ चमूंच्या भेटीचे सत्र कायम असताना रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. आज शेगाव तालुक्यात आणखी २२ रुग्ण आढळून आले. यामुळे शेगाव तालुक्यातील रुग्णांची संख्या १७१ वर पोहोचली आहे. सोमवारी हा आकडा १४९ इतका होता. आज त्यात भर पडली. नांदुरा तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र ७ इतकीच आहे, हाच काय तो आरोग्य यंत्रणांसाठी दिलासा ठरावा.

Story img Loader