बुलढाणा : मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्याने केली आहे. यासाठी त्यांनी थेट उपोषणाचे अस्त्र उगारल्यामुळे मेहकरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
साब्रा येथील ग्रामपंचायत सदस्य गजानन वानखेडे यांनी आपल्या गावातच उपोषण सुरू केले आहे. मागील ऑगस्ट महिन्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना गावांतील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ‘पास’ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आपण सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार रायमूलकर यांच्याकडे केली होती.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात ५२ नवीन तलाठी कार्यालयांची निर्मिती होणार, १८ कोटींचा निधी मंजूर
त्यावेळी आमदारांनी आपणास अश्लील शिवीगाळ करून धमक्या दिल्या व चौघांनी मला आणि भावास मारहाण केली, असा आरोप वानखेडे यांनी केला आहे. यामुळे आमदार रायमूलकर यांना अटक करावी या मागणीसाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार वानखेडे यांनी बोलून दाखविला.