बुलढाणा : कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यावर आणि कामगार मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यावर आकाश फुंडकर यांचे रविवारी प्रथमच जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी शेगाव येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. येथील संत गजानन महाराज संस्थानमधील समाधी स्थळाचे त्यांनी सहकुटुंब दर्शन घेतले. यानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी सावध आणि मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली.
कामगार मंत्रालय फार मोठे असून अभ्यासानंतर मंत्रिपदाच्या कामकाजाला सुरुवात करेल. मंत्रिपदाला न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत, बेरोजगारांना काम द्यायचे आहे, अशी भावना फुंडकर यांनी व्यक्त केली. बुलढाणा पालकमंत्रिपदावर आपण दावा केला नसल्याचे स्पष्ट करून भारतीय जनता पक्ष जो आदेश देईल ते काम मी करत असतो, अशी सौम्य प्रतिक्रिया फुंडकर यांनी दिली. यावेळी माजी मंत्री तथा जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा: समृद्धी महामार्गावर अपघातांसह गुन्हेगारीतही वाढ; डिझेल चोरीसाठी महागड्या वाहनांचा वापर…
संतनगरीत भव्य स्वागत
कामगार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रविवारी जिल्ह्याचे सुपुत्र खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर हे जिल्ह्यात दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावात दाखल होऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतले. यानंतर शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी श्री गजानन महाराज मंदिर परिसरातून विश्राम भवनापर्यंत आकाश फुंडकर यांची मिरवणूक काढण्यात आली. आकाश फुंडकर यांनी नागरिकांना अभिवादन करीत स्वागत, सत्कार स्वीकारले.