बुलढाणा : पाण्यामुळे नव्हे तर ‘फंगस’मुळे केस गळती झाली, यावर बहुतेक वैद्यकीय तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे पाण्यामुळे केसगळती झाली या म्हणण्यात फारसे तथ्य नाही, असे मत राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले. यामुळे पाण्याच्या वापरावरून कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन देखील त्यांनी आज शनिवारी केले. बाधित अकरा गावातील गावकऱ्यांनी भीती न बाळगता आंघोळ करावी, असा सल्ला देखील नामदार फुंडकर यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात प्रारंभी सहा गावांपुरती असलेली केस गळती आता जवळपास ११ गावात पसरली आहे. रुग्ण संख्या ५१ वरून आता सव्वाशे पर्यंत गेली आहे. दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असे आवाहन शासनाने केल्यानंतर मागील आठवडाभरापासून बोंडगाव येथील गावकऱ्यांनी आंघोळच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र पाण्यामुळे केस गळती झालेली नाही. सर्व अफवा आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर करून नागरिकांनी आंघोळ करावी, घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केले. आज शनिवारी त्यांनी शेगाव तालुक्यातील बाधित गावांना भेटी दिल्या. या भेटी नंतर माध्यम प्रतिनिधी सोबत नामदार फुंडकर यांनी संवाद साधला.

हेही वाचा : ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य

काय म्हणाले मंत्री?

आधी जिल्हा आरोग्य विभागाने शेगाव तालुक्यातील बाधित गावांचे सर्वेक्षण केले. भेटी देऊन तपासणी केली. रुग्णाच्या त्वचेचे, रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचे अहवाल लवकरच हाती येणार आहेत. नंतर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची चमू, त्वचा रोग तज्ज्ञ यांनी भेटी दिल्या. गावकऱ्यांना ‘फंगस’ मुळे बाधा झाल्याचा बहुतेकांचा अंदाज आहे.

हेही वाचा : “संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

“ब्लू बेबी सिंड्रोम”चा रुग्णच नाही

बुलढाणा जिल्ह्यामध्ये “ब्लू बेबी सिंड्रोम” नावाचा आजार पसरल्याची माहिती समोर आली. याबाबत कामगार मंत्री यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अशा प्रकारचा कुठलाही रोग जिल्ह्यात झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. हा रोग अंगातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने होत असतो. मात्र तशी लक्षणे असलेला रुग्ण आढळून न आल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana minister akash fundkar said hair loss due to fungus not water in 11 villages of district scm 61 css