बुलढाणा: अस्मानी सुलतानीचा सातत्याने फटका बसलेल्या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांनी नुसता छळ चालविला आहे. जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना मागील हंगामाच्या पीकविमा भरपाईची रक्कम अजूनही मिळाली नाही. यामुळे दोनशे एकवीस कोटी रुपयांची मदत अजूनही कागदोपत्रीच रखडली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी ही धक्कादायक बाब निदर्शनास आणून सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर दिला आहे. या रखडलेल्या भरपाईसाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून ही भरपाई तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील एकुण ३ लाख ५७,१७१ शेतकऱ्यांनी (७,३१,९१० अर्जाद्वारे) ५ लाख,९७ हजार २२१ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा भरला होता. त्यापैकी नैसर्गिक आपत्तीने बाधित २ लाख ,३७ हजार,७४५ शेतकऱ्यांसाठी १३९.४५ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली . मात्र आजअखेर केवळ ६७ ,८७४ शेतकऱ्यांनाच ३८.४९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे. अनेक महिने उलटल्यावरही १ लाख, ६९ हजार ,९०७ शेतकरी पीकविमा मदतीपासून वंचितच आहे. १०१.४६ कोटी रुपये नुकसान भरपाईचे वितरण कागदोपत्री रखडले आहे.
हेही वाचा : चंद्रपूर: चिचपल्ली येथील मामा तलाव फुटला! ३०० घरांमध्ये पाणी शिरले
रब्बी हंगामाची भरपाईही रखडली
खरीप प्रमाणेच रब्बी हंगामाची देखील अशीच गत आहे. सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील १लाख,९२हजार १३७ शेतकऱ्यांनी ३ लाख ६ हजार, ७३६ अर्जाद्वारे पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. यातील केवळ ६४ हजार३६७ शेतकऱ्यांना १३२.७४ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. मात्र आजअखेर ९ हजार २८२ शेतकऱ्यांनाच (१२.९३ कोटी ) नुकसान भरपाई देण्यात आली आहे. बाधित ५५,०८५ शेतकऱ्यांची ११९.८१ कोटीची नुकसान भरपाई प्रलंबित आहे. त्यामुळे महिनोगणती रखडलेली नुकसान भरपाई तत्काळ देण्याची मागणी आमदार शिंगणे यांनी थेट ।मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान मागील हंगामातील नुकसान भरपाई न मिळाल्याने जिल्ह्यातील सव्वा दोन लाख शेतकरी हवालदिल झाले आहे. अगोदरच अस्मानी संकटांनी ते त्रस्त आहेत. यंदा उशिरा पाऊस झाल्याने पेरण्या रखडल्या. हजारो हेक्टरवरील पेरण्या उलटल्याने दुबार पेरण्या कराव्या लागल्या. चांगला भाव मिळणाऱ्या मूग, उडीद चा पेरा घटला.अपुऱ्या पावसाने ७ लाख३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या आणि पिके कशीबशी तग धरून आहेत . यामुळे शेतकरी घायकुतीला आले असताना आता पीक विमा कंपन्या त्यांच्या हक्काची भरपाई रक्कम देत नाही.सरकार देखील याकडे बघायला तयार नाही.आता आमदार शिंगणे यांच्या मागण्यानंतर तरी सरकार हालचाल करणार का? याकडे वंचित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : नागपूर: गडकरींच्या ‘या’ निर्णयाने अधिकाऱ्यांच्या पोटात गोळा
‘सिंदखेडराजा’मध्ये २७ कोटी रखडले
आमदार शिंगणे यांच्या सिंदखेडराजा मतदार संघात २७ कोटींची भरपाई रखडली आहे. चिखली, लोणार, देऊळगांव राजा व सिंदखेड राजा या चार तालुक्यातील एकुण ५३ हजार शेतकऱ्यांना रक्कम २६.९९ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. मात्र अद्यापही ५३ हजार ४६६ शेतकऱ्यांची.२६.९८ कोटी इतकी नुकसान भरपाई वितरीत करणे प्रलंबित आहे.