बुलढाणा : मराठा आरक्षण आंदोलनासाठी बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाची धग आज तिसऱ्या दिवशीही कायम आहे. आज सकल मराठा समाज बांधवांनी नागपूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथे रास्ता रोको केला. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या दीर्घ रांगा लागल्याचे दिसून आले.
हेही वाचा : राजू बिरहाची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द, काय होते प्रकरण? वाचा…
मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. आज नागपूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही ( ता देऊळगाव राजा) येथे मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामुळे भर वाहतुकीच्या या मार्गावरील प्रवाश्यांचे हाल झाले.