बुलढाणा : संतांच्या आणि छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज यांच्या काळात ही अनाजी पंत सक्रिय होते आणि आजही आहे. आधुनिक अनाजी पंतांनी आमचंही घर फोडलं, तीनचार पवार तिकडे गेले. मात्र,त्यांनी लक्षात ठेवावे की, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीय यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही. याचे कारण अख्खा स्वाभिमानी राज्यवासी हा शरद पवारांचा परिवार आहे, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी येथे केले.
बुलढाणा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर जिजामाता प्रेक्षागार नजीकच्या मैदानात आयोजित सभेत बोलताना रोहित पवार यांनीभाजप, केंद्र सरकार, यावर टीकेची तोफ डागली. यावेळी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, उमेदवार नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह आघाडीचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
हेही वाचा : राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात, ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा
यावेळी पुढे बोलताना पवार यांनी, पवार परिवार फोडण्यात ‘ते’ काहीसे सफल झाले असले तरी भाजप सोबत गेले कोण? तर मूठभर नेते गेले.(लवकरच) पडणारे नेते गेले. आमच्या (राष्ट्रवादी) सोबत असलेले नेते निष्ठावान, लढणारे अन जिंकणारे आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. दिल्लीतील ‘महाशक्ती’ फोडा, झोडा ची नीती वापरत, राज्यात पक्ष, घराणे फोडले. आमच्या बाबतीत जे केले तेच ठाकरेंच्या बाबतीत केले. मात्र त्यांच्यासोबत मूठभर नेते गेले, राज्यातील स्वाभिमानी जनता मात्र अमच्यासोबतच आहे, असा दावा त्यांनी केला.तिकडे जाणारे लाचार नेते आज दिल्लीत लोटांगण घालत जागा, उमेदवारी याची मागणी करीत आहे. मात्र मराठी जनता त्यांच्या सोबत जाऊच शकत नाही, कारण येथील जनता स्वाभिमानी आहे, दिल्ली समोर झुकणारी नाही तर लढणारी आहे
‘त्यांच्या घड्याळाची वेळ ४.२०’
अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत दिलेल्या तंबीचा रोहित पवारांनी उल्लेख करून मार्मिक टोले लगावले. त्यांना न्यायालयाने दिलेल्या सूचना लक्षात घेता, ‘त्यांच्याकडे’ केवळ लोकसभा निवडणुकीपुरतेच घड्याळ असल्याचे दिसते. मूळ राष्ट्रवादीच्या घड्याळाची वेळ १०.१० अशी होती. यांच्या घड्याळाची वेळ मात्र ४.२० मिनिटे (चारशेविस) आहे, अशी खिल्ली त्यांनी उडविली.