बुलढाणा : राज्य शासनाच्या जनविरोधी निर्णय व धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) तर्फे जळगाव जामोद तहसिल कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी निदर्शने करून शासकीय रुग्णालयांतील मृत्यूंप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘या सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय’, ‘शासनाचा निषेध असो, निषेध असो’, ‘शरद पवार आगे बढो’ आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना प्रसेनजीत पाटील यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. कंत्राटी पद्धतीने नोकरभरती, दत्तक शाळा योजना, रुग्णालय खाजगी कंपनीना चालविण्यासाठी देणे हे अलीकडे घेतलेले निर्णय सर्वसामान्य, गोरगरीब , विद्यार्थी, बेरोजगार, मागासवर्गीय यांच्या मुळावर उठणारे आहेत, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा : अरबी समुद्रात पुन्हा चक्रीय स्थिती; राज्यात पावसाची शक्यता
युवक, शेतकरी, आर्थिक दुर्बल घटकाला भेडसावणाऱ्या विषयांवर शासन अतिशय उदासिन आहे. कंत्राटी भरतीसारखे तुघलकी निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस-पवार यांचे तिघाडी सरकार आधीच बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेल्या युवकांना वेठिस धरण्याचे काम करत आहे. यामुळे करोडो राज्यवासियांचे भवीतव्य उध्वस्त होणार आहे. नांदेड, संभाजी नगर, ठाणे, नागपूर येथील शासकीय रुग्णालयांतील गोरगरीब रुग्णांच्या मृत्यूंची नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्य मंत्री यांनी आता तरी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
हेही वाचा : रुपाली चाकणकर म्हणतात, “सुप्रियाताईंचं ‘बुकिंग’ म्हणजे ‘साहेबांचा’ आशीर्वादच, अजित पवार मुख्यमंत्री…”
यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला पटसंख्ये अभावी शाळा बंद करू नये, शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा, भरपाई व आर्थिक मदत देण्यात यावी, यासह वरील मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष एम.डी.साबीर, ईरफान खान, करीम खान, संजय ढगे, संजय देशमुख, सिध्दार्थ हेलोडे, मोहसिन खान, दत्ता डीवरे, निजाम राज, सतीष तायडे, अरविंद जुमडे, सदाशिव जाने, ताहेर माही, शंकर अढाव, पवन डिवरे, रेहान अहमद, शेख जावेद, शे. फैजान, अंकित हेलोडे, रेहान अहमद जियाउल्ला देशमुख आदी सहभागी झाले.