बुलढाणा : राज्य क्रीडा महोत्सव अंतर्गत येथे सुरू असलेल्या राज्य कुस्ती स्पर्धेनिमित्त आज दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच महाराष्ट्र केशरी विजेत्या पैलवानांची आज लढत रंगणार आहे. त्यामुळे कुस्तीप्रेमी व क्रीडा रसिकांसाठी ही मोठीच पर्वणी ठरणार आहे. येथील जिजामाता क्रीडा व व्यापार संकुलमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने राज्य क्रीडा महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत काल पासून राज्य कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
आज शनिवारी ( दि १३) आयोजित सामन्यात महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू भिडणार आहेत. यामुळे आजचे सामने उच्च दर्जाचे क्रीडा कौशल्य दाखविणारे ठरणार आहे. यावर कळस म्हणजे कुस्तीमधील दोन दिग्गज खेळाडू यावेळी उपस्थित राहून खेळाडुंचा उत्साह वाढविणार आहेत. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार व ऑलम्पियन , आशियाई विजेता, विश्व चषक रौप्यपदक विजेता हरियाणाचा अमित दहीया स्पर्धेत सहभागी होणार आहे.
हेही वाचा : धक्कादायक! पतंगाच्या मांजाऐवजी पकडली वीज तार… मग झाले असे की…
स्पर्धा पंच म्हणून केशव डंभारे, बकट यादव, अनंत नवाथे, नवनाथ धमाल हे काम पाहत आहे. आज १३ जानेवारीला रात्री साडे आठ वाजता स्पर्धेचा बक्षिस समारंभ पार पडणार आहे. यावेळी काका पवार आमदार संजय गायकवाड, कुस्तीगिर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश कोहळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.