बुलढाणा : गजानन महाराजांचे लाखो भक्त त्यांच्यातच विठुमाऊलीला बघतात. कार्तिकी एकादशीला जे भाविक व वारकरी पंढरपूरला जाऊ शकत नाही, ते दरवर्षी शेगावात दाखल होऊन श्रीचरणी नतमस्तक होतात. यंदाची कार्तिकीदेखील या अलिखित परंपरेला अपवाद नाही. यातच एकादशी व गजानन महाराजांचा दिवस गुरुवार एकत्र आल्याने जिल्ह्यासह राज्याभरातून हजारो आबालवृद्ध भाविक विदर्भपंढरीत दाखल झाले.

बुधवारी रात्रीपासूनच मंदिर परिसर व मंदिराकडे जाणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेले. जिल्ह्यासह दूरवरून येणाऱ्या दिंड्याचे कालपासूनच शेगावी आगमन व्हायला सुरुवात झाली. आज, गुरुवारी सकाळपर्यंत सुमारे १५० दिंड्या संतनगरीत दाखल झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी शरद पवार १२ डिसेंबरला नागपुरात, विधानभवनावर धडकणार यात्रा

संत गजानन महाराज संस्थान मंदिरात आज दिवसभर कार्तिकी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गजानन महाराज समाधीस्थळ दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांच्या दीर्घ रांगा लागल्या. दर्शनासाठी किमान दोन ते अडीच तास लागत असून मुख दर्शनासाठी देखील तासाभराचा अवधी लागत आहे.

Story img Loader