बुलढाणा: मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज रविवारी, १८ऑगस्ट रोजी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. शिष्टमंडळाचे वतीने देऊळ घाट येथील ताहेरा मस्जिद चे इमाम तथा जमियत -ए-उलेमा संघटनेचे पदाधिकारी तहसीन शाह यासीन शाह (राहणार मोमीनपुरा, देऊळघाट) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यात नमूद केले आहे की, मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा एक ‘व्हिडिओ’ समाज माध्यमावर ‘व्हायरल’ झाला आहे.

या चित्रफीत मध्ये महंत रामगिरी महाराज (राहणार श्री क्षेत्र गोदावरी धाम, बेट सटाली,श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर) हे मुस्लिम धर्मियांचे आराध्य पैगंबर मोहम्मद यांच्या जीवन चरित्रबद्दल बेताल वक्तव्य करताना दिसत आहे. तसेच चुकीची माहिती देत आहे. यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक असे कृत्य करून मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे. यामुळे रामगिरी महाराज विरुद्ध मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली.

हेही वाचा : Rakshabandhan 2024: रक्षाबंधन सणाचा इतिहास व महत्त्व…कसे करावे रक्षाबंधन?

बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध आज १८ ऑगस्टला भारतीय न्याय संहिता २०२३, च्या कलम २९९ नुसार गुन्हा दाखल केला. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार माधवराव गरुड यांनी या कारवाईची पुष्टी केली आहे. हा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात येणार असल्याची पूरक माहितीही ठाणेदार गरुड यांनी दिली.

दोन समाजात तेढ निर्माण ‘पोस्ट’

रामगिरी महाराज यांची पैगंम्बर मोहम्मद यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा ‘व्हीडिओ’ सार्वत्रिक झालेला आहे. हा वादग्रस्त व्हीडिओ आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारी एक ‘पोस्ट’ बुलढाणा येथील इसमाने फेसबुकवर सार्वत्रिक केली.यामुळे शनिवारी, १७ ऑगस्ट रोजी, रात्री बुलढाणा शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुलढाणा शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान एका विशिष्ट धर्माचे शेकडो तरुण शहर ठाण्यात धडकले.पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल केला. आरोपीला जुनागांव येथून ताब्यात घेतल्याने तणाव निवळला.

बुलढाणा शहर पोलिसांनी शहरातील जुना गाव मधील रहिवासी आरोपी मिलिंद चिंचोळकर याच्या विरुद्ध कारवाई केली. वसीम खान यांच्या तक्रारीवरुन आरोपी मिलिंद चिंचोळकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : मनेका गांधी म्हणतात, “गडकरीजी…मैं आपकी बहोत बडी फॅन हुं…”

जळगाव येथेही कारवाई

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाणे येथेही गुन्हा दाखल करण्यात आला. मौलवी खलील-उर-रहेमान अब्दुल लतीफ यांनी प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी मध्येही सार्वात्रिक चित्रफीतचा उल्लेख असून रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या वक्तव्यामूळे मुस्लिम धर्मीय बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे नमूद आहे. महंत रामगिरी महाराज विरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी रामगिरी महाराज विरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २९९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा वैजापूर ( छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे. जळगाव जामोद पोलिसांनी याची पुष्टी केली आहे.