बुलढाणा : राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी करण्यात आलेली आकर्षक रोषणाई, पुष्पहारांची मनोहरी सजावट, दर्शनासाठी गुलाबी थंडीत पहाटे पासून लागलेल्या आबालवृद्ध जिजाऊ अन शिव भक्तांच्या दीर्घ रांगा, सर्वत्र लावण्यात आलेल्या भगव्या पताका आणि सर्वत्र फडकणारे भगवे ध्वज, सर्वत्र गुंजणारा जय जिजाऊचा गगनभेदी जयघोष, आसमंतात निनादणारे स्फूर्तिदायक पोवाड्यांचे सूर, पाऊण लाखाच्या आसपास असलेल्या भाविकांच्या गर्दीने फुललेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लहान मोठे मार्ग असा मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीचा थाट दिसून आला… निमित्त होते शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या ४२७ व्या जयंती सोहळ्याचे. सिंदखेड राजा येथील राजे लखुजी राजवाडा अर्थात जिजाउंच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा’मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते सूर्योदयावेळी शासकीय महापुजा करण्यात आली.

हेही वाचा : उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त

विद्युत रोषणाई, फुलांनी सजले जन्मस्थान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता. दरवर्षीप्रमाणे या जन्मस्थळी मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेला लखुजीराजे जाधव यांचा राजवाड्याची आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती. राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात हजारो जिजाऊप्रेमींची गर्दी होती. या सोहळ्यात शाळकरी मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवला होता. जिजाऊ आणि बाल शिवाजी यांची वेशभूषा अनेकांनी साकारल्याचे दिसून आले .

मान्यवरांची मांदियाळी

पुरातत्व विभाग, नागपूर, सिंदखेड राजा नगरपरिषद आणि मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव, माजी आमदार डॅा. राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर,माजी नगराध्यक्ष नाझर काझी, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सदाशीव शेलार, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार, मुख्याधिकारी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेवून अभिवादन केले.

हेही वाचा : नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…

महापुजा पार पडल्यानंतर केंद्रीयराज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, सिंदखेड राजा नगरीमध्ये राजमाता जिजाऊ यांचा ४२७ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मॅा जिजाऊ साहेब यांच्या रुपाने सिंदखेड राजा नगरीला आदर्श माता, पूत्र घडविणारी राष्ट्रमातेची नगरी म्हणून जगात ओळख असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेसाठी प्रस्ताव

जिजाऊ जन्मस्थळी नतमस्तक झाल्यावर कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत अनौपचारिक संवाद साधला. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजा करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल, असे सूतोवाच त्यांनी केले . सिंदखेड राजा विकास आराखड्याला गती देण्यात येईल. लखुजीराजे जाधव राजवाडा या माँ जिजाऊ जन्मस्थळासंदर्भातील विकास कामांमधील अडचणी दूर करुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न करणार असे आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले. राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव हे महाराष्ट्रातील भक्तांसाठी दर्शनाची वर्षभराची शिदोरी असते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्शन घेण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana rajmata jijau jayanti 2025 sindkhed raja scm 61 css