बुलढाणा : लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे ४ सप्टेंबरच्या उत्तररात्री अज्ञात दरोडेखोरांनी धुडघूस घालून चार घरातून ऐवज लंपास केला. क्रूर चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्यालाही दया न दाखवता लुटले. तसेच सीसीटीव्हीची तोडफोड व दिशा बदलून लूटमार केली. यामुळे लोणार पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वडगाव तेजनच नव्हे तर तालुक्यातील ग्रामीण परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
पालखी मार्ग शेगाव – पंढरपूर व सुलतानपुर येथील राज्यमहामार्गापासून नजिकच वडगाव तेजन हे गाव आहे. जालना लाठीमार चे पडसाद उमटलेल्या जिल्ह्यात आंदोलने होत. यामुळे पोलीस यंत्रणा गुंतली आहे. याच फायदा येथे ४ सप्टेंबरच्या उत्तररात्री सुसज्ज टोळीने ग्रामस्थ गाढ झोपेत असल्याचा फायदा घेतला. रस्त्यावरच असलेल्या घरावर शेतकरी रामकिसन रामराव तेजनकर (६५)यांच्या घरात प्रवेश करून दोघेही पती-पत्नीला बांधून ठेवले. नंतर दोघांच्या गळ्याला चाकू लावून तोंडात बोळा कोंबला. त्यांच्याकडे मिळेल तो ऐवज व रोख घेऊन चोरटे व घरात असलेले पैसे व दागिने घेऊन पसार झाले.
लष्करात कार्यरत नारायण कुलाल यांच्या घराला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. कॅमेऱ्याची दिशा बदलुन घरामध्ये चोरी केली. यापाठोपाठ जुन्या गावांमध्ये राहणाऱ्या विशाल तेजनकर व इंदु त्रंबक मानवतकर यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारून सोने व रोख रक्कम पसार केली. ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार रामकिसन रामराव तेजनकर (६९) यांनी लोणार पोलीस स्टेशनला दिली.
हेही वाचा… गोंदिया : भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; देवरी तहसील कार्यालयासमोरील घटना
लोणारचे ठाणेदार मिनिश मेहेत्रे यांनी सहकाच्यासह घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. बुलडाण्यावरून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. तपास पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, हवालदार ज्ञानेश्वर शेळके, रोहीदास जाधव, दराडे, शेळके करीत आहे.