बुलढाणा: काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील आया बहिणींनी पराभवाचा जबर तडाखा दिला. यामुळे ‘जमिनीवर’ आलेल्या राज्यातील महायुती सरकारने ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना अंमलात आणली. माता भगिनी अचानक सत्ताधारी नेत्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली. दीड हजार द्यायचे आणि बहिणीकडून अप्रत्यक्षपणे पाच हजार उकळायचे, असा हा गोरखधंदा आहे, असे त्या म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिशा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने येथे आयोजित तीन दिवसीय महिला उद्योजक मेळावा आणि महिला बचत गट प्रदर्शनीचे रोहिणी खडसे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. ४ ते ६ ऑक्टोंबर दरम्यान मलकापूर मार्गावरील ‘एआरडी मॉल’च्या मागील मैदानात ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. प्रदर्शनीचा उद्धाघाटन समारंभ शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी दुपारी थाटात पार पडला . यावेळी शिवसेना (ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारे, प्रदेश काँग्रेस समितीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस हेमलता पाटील, जयश्री शेळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील बचत गट पदाधिकारी, सदस्या यांची भरगच्च उपस्थिती होती.

हेही वाचा : “महाराष्ट्राची मान शरमेने खाली, हे सरकार फक्त मलई खाण्यात…”, पटोलेंकडून टीकांचा भडिमार

रोहिणी खडसे म्हणाल्या की, राज्यकर्ते दीड हजार रुपये देऊन खूप काही दिल्याचा आव आणत आहेत. मात्र दीड हजार द्यायचे आणि महिलांच्या ‘बजेट’मधून पाच हजार उकळायचे असा हा खेळ आहे. मागील काही दिवसातच सर्व प्रकारच्या डाळी, गोडे तेल, साखर, शेंगदाणे खोबरे, गॅस चे दर। भरमसाठ वाढविण्यात आले आहे. यातून ही बाब स्पष्ट होते. ‘पंधरासो रुपये देंगे, लेकीन पाच हजार लेके जाऐंगे’ असा हा सगळा खेळ आहे. तरीही राज्यकर्ते उपकाराची भाषा करतात, अशी खंत खडसे यांनी बोलून दाखविली.

महिलांच्या अपमानामुळेच रामायण अन् महाभारत…

युती शासनाच्या काळात महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असून महिला ,युवतीच नव्हे बालिका वरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. या पीडित शोषित माता बहिणींचा आक्रोश, किंकाळ्या, रुदन या सरकारला ऐकूच येत नाही, असे भयावह चित्र आहे. नेत्या असो की सामान्य महिलांवर दवाब तंत्राचा वापर करण्यात येत आहे. सत्ताधारी नेते आमदार यांच्याकडून महिलांचा जाहीर अवमान, उपमर्द करण्यात येत असल्याचे विदारक चित्र आहे. मात्र महिलांचा उपमर्द झाला की रामायण घडते, महाभारत घडते याचे भान राज्य कर्त्यांनी ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा : अमरावती: “अपूर्ण विमानतळाचे लोकार्पण करण्‍याचा घाट..”, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांची टीका

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. याचा उदोउदो करणाऱ्या राज्य सरकारने राज्यातील खेड्यापाड्यात मराठी भाषेत शिक्षण देणाऱ्या तब्बल ६०० शाळा बंद केल्या आहे. हे करंटे काम करणाऱ्या सरकाराने एक अख्खी पिढी बरबाद केल्याचा घणाघात रोहिणी खडसे यांनी यावेळी केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.आमचे सरकार आल्यावर आम्ही ‘लाडकी शाळा’ ही मोहीम राबविणार, अशी घोषणा त्यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमल झंवर, कॉंग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर, मृणाली सपकाळ , मिनल आंबेकर, सरिता एकडे, नंदिनी टारपे, पद्मजा लिंगाडे, अर्चना खेडेकर, मालती शेळके, लक्ष्मी शेळके, कमल बुधवत, हिना सौदागर, महिला उद्योजिका सीताबाई मोहिते यांची विशेष उपस्थिती होती . महिला बचत गटाच्या पदाधिकारी आणि सदस्यांची यावेळी भरगच्च उपस्थिती होती.  उद्घाटन सोहळ्यापूर्वी समाज प्रबोधनकार प्रवीण दवंडे यांचे कीर्तन रंगले .विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. 

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana rohini khadse criticizes mahayuti on ladki bahin yojana scm 61 css