बुलढाणा : राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज, रविवारी संध्याकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे दाखल झाले. ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा असल्याने कडक बंदोबस्तात संत गजानन महाराज मंदिर परिसरात वाहनांच्या ताफ्यासह त्यांचे आगमन झाले. त्यांनी गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले. काही क्षण ते श्रीचरणी लीन झाले. मंदिर परिसरातील गादी स्थान, विसावा गृह आणि इतर ठिकाणी दर्शन घेवून काही काळ ते मंदिर परिसरात विसावले.
हेही वाचा : चंद्रपुर : बाजार समितीचे उपसभापती पोडेंसह तिघांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू
संतनगरीतून ते संध्याकाळी उशिरा वाशीमकडे रवाना झाले. आज वाशिम येथे त्यांचा मुक्काम असून उद्या सोमवारी ते नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूरगडाला रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाणार आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचा राष्ट्रार्पण सोहळा जानेवारी महिन्यात आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक देशभरातील तीर्थक्षेत्र, देवस्थानांचा प्रवास करीत आहेत. याअंतर्गत त्यांनी आज गजानन महाराजांचे दर्शन घेतले.