बुलढाणा : जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या महिला आयोगाच्या जनसुनावणीला पीडित, अन्यायग्रस्त महिलांची गर्दी झाल्याचे दिसून आले. नियोजन भवनात सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली सुनावणी दुपारी तीन वाजेपर्यंत चालली. यावेळी बोलताना चाकणकर यांनी महिला आयोग पुरूषांच्या विरोधात नाही, तर तो विकृतींच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन केले.
त्या म्हणाल्या, संविधानाने महिलांना समान दर्जा दिला असून हा सन्मान पुरूषांविरोधात नाही, तर तो पाठबळ देण्यासाठी आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून राज्य महिला आयोगाचा प्रवास आता बदलत आहे. बेपत्ता होण्याचे प्रमाण, सायबर गुन्ह्यांत होणारे महिलांचे शोषण, गर्भलिंग निदान चाचणी, माता व बाल मृत्यू याबाबत महिला प्रश्न विचारत नाहीत. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायदा किंवा प्रशासनाने अंकूश ठेवणे अभिप्रेत नाही. प्रत्येक व्यक्तीने याची सुरूवात स्वत:पासून करावी लागणार आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम म्हणजे तात्काळ निर्णयाची खात्री आहे.
हेही वाचा : अरबी समुद्रात पुन्हा चक्रीय स्थिती; राज्यात पावसाची शक्यता
मुंबईतील कार्यालयात येऊन राज्यभरातील अनेक महिलांना तक्रार मांडणे अशक्य ठरते. त्यामुळे आयोग आता जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत आहे, असे चाकणकर यांनी म्हटले आहे. यावेळी आयोगाच्या सदस्या आभा पांडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल डिघुळे उपस्थित होते.