बुलढाणा : अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी खात्री असल्यानेच सुप्रिया सुळेंनी अजित दादांना सर्वप्रथम हार घालण्यासाठी बुकिंग केलं आहे, अशी मार्मिक प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी येथे दिली. ‘अजित दादांप्रति असलेली त्यांची तळमळ, प्रेम हे कायम राहो अशी भावना व्यक्त करून ताईंचे ‘बुकिंग’ म्हणजे (दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी) पवार साहेबांचाही आशीर्वाद आहे अशी पुस्तीही चाकणकर यांनी जोडली.
हेही वाचा : धक्कादायक! अंगझडती घेतली असता आढळली…
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत चाकणकर यांचे बुलढाणा येथे आगमन झाले. आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जन सुनावणीला उपस्थित राहण्यापूर्वी निवडक प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, अजित दादा मुख्यमंत्री हे स्वप्न आहे, असं शरद पवार यांनी म्हटल्यानंतर सुप्रियाताईंचे विधान आले आहे. त्यामुळे सुप्रिया ताई यांच्या शुभेच्छा आहेत तर साहेबांचाही आशीर्वाद निश्चित असेलच, असा युक्तिवाद चाकणकर यांनी केला. त्यांचे दादांबद्दलचे हे प्रेम, मनस्वी तळमळ कायम राहो हीच आपली सदिच्छा असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. कुपोषणावर विचारणा केली असता, गर्भवती माता व मुलींना देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा उत्तम आहे. त्यामुळे कुपोषणाची टक्केवारी ४१ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आल्याचा दावा चाकणकर यांनी बोलून दाखविला.