बुलढाणा : संत गजानन महाराज यांचा १४६ व्या प्रकटदिन उत्सव येत्या ३ मार्च रोजी संतनगरीत उत्साहात साजरा होत आहे. संत नगरीमध्ये उत्सवाच्या निमित्ताने १ मार्च रोजी रात्रीपर्यंत राज्यभरातून सहाशेच्यावर भजनी दिंड्यांचे आगमन झाले आहे . दरम्यान भाविकांची मोठी गर्दी व सुविधा लक्षात घेता गजानन महाराज मंदिर आज व उद्या ( २ व ३ मार्चला) रात्रभर खुले राहणार आहे. टाळ मृदंगाच्या गजराने विदर्भपंढरी शेगाव नगरी दुमदुमून जात आहे.
श्रींच्या प्रकट दिन उत्सवास श्रीचे मंदिरात २५ फेब्रुवारी पासून महारुद्रस्वाहाकारने सुरुवात झाली. दररोज मंदिरामध्ये काकडा, भजन, दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ, आणि रात्री कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत राज्यभरातून ठिकठिकाणीच्या भजनी दिंड्या संतनगरीमध्ये २५ फेब्रुवारी पासून दाखल होत आहेत १ मार्च रोजी रात्रीपर्यंत ६०० भजनी दिंड्यांचे आगमन झाले आहे.
हेही वाचा…गडचिरोलीत भाजपचा नवीन चेहरा ?
संस्थान कडून विसावा भक्त निवास संकुल परिसरात टेन्ट उभारून या भजनी दिंड्यांची नोंदणी तसेच नियमांची पूर्तता करणाऱ्या भजनी दिंड्यांना दहा टाळ, एक मृदंग, एक विना,एक हातोडी,सहा माऊली पताका भजनी साहित्य व श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथ भागवत साहित्य वितरण केले जात आहे. भजनी दिंडी मधील सर्व वारकरी भाविक भक्तांची सर्व व्यवस्था तसेच त्यांना महाप्रसाद वितरण श्री संस्थान कडून करण्यात येत आहे.
प्रकट दिन कार्यक्रम
३ मार्च रोजी श्रींचे मंदिरामध्ये सकाळी १० वाजता या महारुद्रस्वाहाकार यांगाची पूर्णाहुती होईल . नंतर १० ते १२ श्रींचे शेगावी प्रकटनिमित्त कीर्तन पार पडेल. दुपारी ४ वाजता श्रींची पालखी परिक्रमा मंदिर मधून शहरातील परिक्रमा मार्गाने निघेल. सायंकाळी ही परिक्रमा संपवून पालखी परत मंदिरात पोहोचेल. मंदिरात महाआरती व वारकऱ्यांचा नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडेल. त्यानंतर पालखी परिक्रमेची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी ४ मार्च रोजी सकाळी ७ ते ८ काल्याचे किर्तनाने श्रींच्या प्रकट दिन उत्सवाची सांगता होईल.
हेही वाचा…बच्चू कडू यांचे अध्यक्षपद वाचविण्यासाठी महायुतीची धडपड
विविध उपक्रम
श्रींच्या समाधी मंदिरावर, परिसर, व प्रवेशद्वार यावर रंगीबेरंगी आकर्षक अशी विधुत रोषणाई करण्यात आली आहे. शेगाव-नागपुर-अकोट या श्री गजानन सेवा समितीच्या वतीने २ व ३ मार्च रोजी भाविकांसाठी स्थानिक अग्रसेन भवन येथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. माधवबाग अकोला(आकाशवाणी), श्री गजानन सेवा समिती व स्व ओमप्रकाश रामगोपाल गोयनका ट्रस्ट यांच्या सयुंक्त विद्यमाने मोफत हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. २ व ३ मार्च स्थानिक अग्रसेन भवन येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत या शिबिरात हृदय रोग निदान तपासणी व अन्य तपासण्या करण्यात येतील.