बुलढाणा : चोरट्यांच्या सुसज्ज टोळीने चक्क एटीएम त्यातील लाखोंच्या रक्कमेसह उचलून नेल्याची घटना संग्रामपूर येथे घडली. आज रविवारी सकाळी ही बाब लक्षात येताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. नवीन वर्षात चोरांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. घटनास्थळी श्वानपथक, तंत्रज्ञ, वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. यामुळे विस्तृत तपशील मिळू शकला नाही.
प्राथमिक माहितीनुसार, आज रविवारी पहाटे ३ ते ४ वाजेदरम्यान ही अफलातून चोरी झाली. टोळीने मोठी रक्कम असलेले एटीएम उखडून सोबत आणलेल्या चारचाकी मालवाहू वाहनात टाकले. ते वरवट बकालकडे रवाना झाल्याचा अंदाज आहे. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये
कैद झाला आहे. त्यातील ‘फुटेज’ तपासात कामी येणार आहे. संग्रामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम तोडून चोरी झाल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहे.
हेही वाचा : ‘ती’ निघाली तोतया पत्नी; मृत अभियंत्याची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा
पोलीस बंदोबस्तात अन्…
चोरट्यांनी चोरीचा ‘मुहूर्त’ही विचारपूर्वक ठरविल्याचे दिसते. केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव आज संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे संकल्प यात्रेवर आहे. त्यामुळे तामगाव व सोनाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी बंदोबस्तात आहे. ही संधी साधून चोरट्यांनी चोरीचा बंदोबस्त लावत एटीएमची वाहनातून ‘यात्रा’ केली आहे.