बुलढाणा : मनोज जरांगे-पाटील यांच्या आरपारच्या आंदोलनाचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटत आहे. संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर ग्रामस्थांनी हातात लाठ्याकाठ्या घेऊन नेत्यांना गावबंदी जाहीर केली आहे.
हेही वाचा : हजार रुपये कमविण्याच्या नादात १६ लाख गमावले, सायबर गुन्हेगारांकडून महिलेची आर्थिक फसवणूक
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आता बुलढाणा जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राहेरी, ताड शिवणी ( सिंदखेडराजा) या गावांनी नेत्यांना गावबंदी लागू केली. तरवाडी (नांदुरा) ग्रामपंचायतीने तसा ठरावच पारित केला आहे. आज, सोमवारी संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे या गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शाळेत जाणार नाही, असा निर्णय जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या या निर्णयाला त्यांच्या पालकांचाही पाठिंबा आहे. दुसरीकडे, राजकीय नेते व लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर लाठ्याकाठ्या घेऊन राजकीय नेत्यांना गावात येऊ नका, असे ठणकावून सांगितले.