बुलढाणा : जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या ‘त्या’ वृद्ध जोडप्याने नातेवाईकांच्या भेटी घेतल्या. सर्वाना भेटीने आनंद झाला, पाहुणचार करुन त्यांचा निरोप घेऊन ‘ते ‘ परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र ही शेवटची भेट आणि अखेरचा निरोप ठरला!याचे कारण परतीच्या प्रवासात या दोघांवार अपघातरूपी काळाने झडप घातली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.
निना ज्ञानदेव नारखेडे (६५ ), सुनिता निना नारखेडे (५९ ) असे मृत वृद्ध पतीपत्नीची नावे आहेत. ते मुक्ताईनगर (जि. जळगाव )तालुक्यातील रुईखेड येथील रहिवासी आहेत. हे दोघे बुलढाणा जिल्ह्यातील दुधलगाव (तालुका मलकापूर ) या गावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी (एम एच- १९ सीसी २२९४ क्रमांकाच्या ) दुचाकीने निघाले होते. शनिवारी त्यांनी दिवसभर सर्व सोयऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, पाहुणचार घेतला. नंतर रात्री उशिरा सर्वांचा निरोप घेऊन नारखेडे दाम्पत्य आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी त्यांना व नातेवाईकांना ही आपली अखेरची भेट आहे याची यतकिंचितही कल्पना नव्हती.
हेही वाचा : मोस्ट वाँटेड खलिस्तानवाद्याला चंद्रपुरातून अटक, अमृतसर येथील पोलीस चौकीवर ‘हँडग्रेनेड’…
निरोपाने दोन्ही गावात उसळला आकांत
मलकापूरनजीकच्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील रणथम फाट्यानजीक या जोडप्याच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत निना नारखेडे , सुनिता निना नारखेडे हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील टोलनाक्यावर असलेल्या रूग्णवाहिकेद्वारे सचिन संबारे, दिपक म्हस्कादे, निना खडसे यांनी त्या दोघांना उपजिल्हा रूग्णालयात आणले. मलकापूर उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या पती पत्नीच्या गावी सुखरूप पोहोचण्याच्या निरोपाची घरची मंडळी आणि दुधलगाव येथील सोयरे आतुरतेने वाट पाहत होते. मात्र या अपेक्षित निरोप ऐवजी त्यांना त्यांच्या अपघाती मृत्युंची बातमी कळाली. यामुळे रुईखेड आणि दुधलगाव येथील नातेवाईकत एकच आकांत उसळला. शोकाकुल नातेवाईकांनी मलकापूर रुग्णालयात धाव घेतली.