बुलढाणा : चौघा इसमानी केलेली अमानुष मारहाण आणि धारधार चाकूने सपासप वार केल्याने वृद्ध पित्याचा मृत्यू झाला, तर पुत्र गंभीर जखमी झाला. खामगाव तालुक्यातील शेलोडी गावात हा थरारक घटनाक्रम घडला होता. या घटनेत मृत पावलेल्या रघुनाथ गाडे यांचा मृतदेह आज बुधवारी, पाच मार्च रोजी संध्याकाळी संतप्त नातेवाईकांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला. नातेवाईकांचा आक्रोश, न्यायासाठीची आक्रमकता आणि नातलग असलेल्या महिलांनी फोडलेला हंबरडा, टाहो यामुळे पोलीस ठाण्यात अभूतपूर्व चित्र निर्माण झाले. हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची आक्रमक भूमिका सगे सोयऱ्यांनी घेतली. यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी अडचणीत आल्याचे दिसून आले.

खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे दोन कुटुंबातील जुना वाद नव्याने उफाळून आल्याने हे हत्याकांड घडले. या हल्ल्यात रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गोपाल गाडे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारसाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. शेलोडी येथील रघुनाथ गाडे आणि पवन दशरथ बानाईत यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून जुना वाद सुरू आहे . या वादातून पवन बानाईत याने रघुनाथ गाडे यांना ‘एखाद्या दिवशी जीवाने मारण्याची धमकी’ दिली होती. गाडे व बाणाईत परिवारातील हा वाद शमण्याऐवजी आणखी उफळला. दरम्यान घटना प्रसंगी रात्री घरासमोर गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही कुटुंबातील वाद पुन्हा उफाळून आला. यावेळी पवन बानाईत याने धारदार शस्त्राने रघुनाथ गाडे यांच्यावर निर्घृणपणे सपासप वार केले. त्याने वडिलांना वाचवण्यासाठी आलेल्या गोपाल गाडे याच्या पोटातही शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. सदर घटना लक्षात येताच गाडे कुटुंबीयांनी जखमींना खामगाव येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झाला तर गोपाल गाडे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारसाठी अकोला येथे हलविण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ असून डॉक्टर त्याचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

याप्रकरणी मृत रघुनाथ गाडे यांचा पुतण्या मनोहर गाडे याने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी पवन दशरथ बानाईत, मनोरमा दशरथ बानाईत, दशरथ आत्माराम बानाईत, मोहन दशरथ बानाईत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता, दोन हजार तेवीस च्या कलम ११८ (२), ३५१(२)(३), ३(५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक रांची पुसाम करत आहेत. या घटनेमुळे शेलोडी गावात तणाव निर्माण झाला असून खामगाव ग्रामीण पोलीस परिस्थिती वर नजर ठेवून आहे.

दरम्यान रघुनाथ गाडे यांच्या मृतदेह सह नातेवाईक, शेलोडी येथील काही गावकरी यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला. मृतदेह खाली ठेवून या सर्वांनी कमी अधिक अर्धा तास ठिय्या दिला. हल्ल्यातील सर्व आरोपीना अटक केल्याशिवाय तिथून न हलण्याचा आणि अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार संतप्त नातेवाईकांनी बोलून दाखविला. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकारी, खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी समजूत घातल्यावर अखेर सुमारे अर्ध्या तासानंतर नातेवाईवाईकांनी अघोषित ठिय्या मागे घेतला. तसेच रघुनाथ गाडे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक शेलोडी कडे रवाना झाले. यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

Story img Loader