बुलढाणा : गुलाबी थंडी, परिसरात बहरलेली शेती, देखणे आयोजन व संयोजन, एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण, दर्दी संगीत प्रेमींची मिळणारी दाद, अश्या थाटात अन दिमाखात नजीकच्या वरवंड येथे आज पाडवा पहाट रंगली! ‘इंडियन आयडॉल फेम’ राहुल खरे यांच्या चौफेर गायकीने उपस्थित दर्दी रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘शाहू परिवार’चे संदीप शेळके व मालती शेळके यांनी आज मंगळवारी वरवंड( ता बुलढाणा) येथे या सुश्राव्य मैफिलेचे आयोजन केले. संस्थापक भाऊसाहेब शेळके, सुनील शेळके, ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर, ठाणेदार माधव गरुड, जिल्हा बँकेचे ‘सीईओ’ अशोक खरात, प्रा. कारभारी भानुसे, डॉ हटकर, नितीन पडघान यांच्यासह शेकडो संगीत प्रेमींनी मैफिलीचा आस्वाद घेतला.
हेही वाचा : यंदा छोट्या विक्रेत्यांचीही दिवाळी जोरात, काय आहेत कारणे?
गुलाबी थंडीत रंगलेल्या मैफिलीचा प्रारंभ मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, जय जय रामकृष्ण हरी, गणपती- गुणपती-गंधपती या भक्ती रचनांनी झाला. गौरव महाराष्ट्राचा या बहुचर्चित स्पर्धेचा विजेता असलेल्या राहुल खरे यांनी नंतर संत नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या रचना- अभंग ताकदीने सादर केले. काकड आरतींची गुंफण व दिवंगत सातारकर महाराज यांची हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे भक्तीगीत सादर केले. अनुप जलोटा यांचे कैसी लागी लगन, संत कबिरांच्या, नही भरोसा पलका, संगत मत करना खोटी, या रचना सादर करून हिंदीवरील प्रभुत्वही सिद्ध केले. देव देव्हाऱ्यात नाही, आकाशी झेप घेरे या रचना सादर करून श्रोत्यांना भक्तिरसात चिंब केले. कानडा राजा पंढरीचा, विठ्ठला तू वेडा कुंभार, येई वो विठ्ठले, माझे माहेर पंढरी ही अभंगे सादर करून श्रोत्यांना पंढरीची सफर घडवून आणली.
हेही वाचा : गोंदिया : झाडीपट्टीच्या नाट्याचा उठणार पडदा! स्थानिक कलाकारांकडून संस्कृतीची जोपासना, मंडई उत्सवाची धूम
भावगीत ते कव्वाली
पाडवा पहाट चा पूर्वार्ध भक्ती रसात रंगला. त्यानंतर उत्तरार्धात राहुल खरे यांनी आपल्या गायकीतील अष्टपैलूत्व चे दर्शन घडविले. तसेच प्रेम, विरह, वीर रसाच्या उत्कट रचना प्रभावीपणे गात रसिकांना जागीच खिळवून ठेवले. किशोर कुमार यांचे अगर तुम ना होते हे सदाबहार चित्रपटगीत सादर केल्यावर त्यांनी, तेरे मस्त मस्त नैन, चैन एक पल ना आवे, मै रहू ना रहू पर प्यार रहे, दमादम मस्त कलंदर, या सुफी व उडत्या चालीची पंजाबी गीते लीलया सादर करीत श्रोत्यांना चकित केले. ‘फर्माईश’ वरून हंगामा है क्यूँ बरसा, हमको किसके गम ने मारा या मेहंदी हसन, गुलाम अली यांच्या सुप्रसिद्ध गजल पेश केल्या. शेतकऱ्यांच्या व्यथा व वेदना विशद करणारे ‘खेळ मांडला’ हे करुण गीत सादर करून त्यांनी उपस्थित्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. मित्र वणव्या मध्ये गारवा या गीताने मैत्रीचे महत्व अधोरेखित केले. समारोपात मेरी जान जाये वतन के लिये, ही देशभक्ती पर कव्वाली सादर करून वाहवा मिळविली.
हेही वाचा : पतीवर उपचार सुरू असताना पत्नीने रुग्णालयातच घेतला गळफास
बाळा तू माझ्याकडे शिकायला ये…
गौरव महाराष्ट्राचा व आयडॉल स्पर्धा गाजविल्याने राहुल खरेंचे नाव देशात गेले. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर हे देखील त्याच्या गायकीने प्रभावित झाले. त्यामुळे त्यांनी ‘बाळा तू माझ्याकडे शिकायला ये’ असे आमंत्रण दिले. सध्या राहुल वाडकर यांच्याकडे गायन शिकत आहे. मूळचा मराठवाडयातील कन्नड चा रहिवासी असलेल्या राहुलने आश्रमात शिक्षण घेतले. तेथील भानुसे सरांनी दिलेल्या प्रोत्साहन मुळे आपण इथवर मजल मारल्याचे राहुलने यावेळी विनम्रपणे सांगितले.