बुलढाणा : अयोध्या येथील श्रीराममंदिर लोकार्पण सोहळा व श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त विदर्भ पंढरी शेगाव येथील गजानन महाराज संस्थान मंदिर सजले आहे. सोमवारी (दि. २२) शेगावसह संस्थानच्या सर्व शाखांवर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शेगाव संस्थान मंदिर परिसर आंब्याच्या पानांची तोरणे, केळीच्या खांबा, रंगबेरंगी फुलांनी सजविण्यात आला आहे. तसेच ‘श्रीं’चे आराध्यदैवत प्रभु श्रीराम व ‘श्रीं’च्या मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उद्या सायंकाळी दिव्यांची आरास करण्यात येईल. संपूर्ण दिवस श्रीरामचंद्रप्रभूंचे भजन व नामस्मरण कार्यक्रम सुरू राहतील.
हेही वाचा : फडणवीस यांच्या नागपूरच्या निवासस्थानी श्रीरामाचे कटआऊट्स
‘श्रीं’च्या मंदिरात शंख, नगारा वादन, पुष्पवृष्टी तसेच श्रीरामप्रभू व श्रींची महाआरती करण्यात येईल. सकाळी ९ ते रात्री ९ वाजतादरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजता श्रीरामचंद्रप्रभूंची आरती, नंतर भाविकांना मंदिर बंद होईपर्यंत लाडूचे वितरण सुरू राहील. सर्व शाखांवरही श्रीराममंदिर लोकार्पण व श्रीरामप्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.