बुलढाणा : मराठी भाषेत ‘निर्लज्जम सदा सुखी’ अशी म्हण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याचे मासलेवाईक उदाहरण आहे. गद्दार कायम गद्दार असतो आणि पळपुट्यांची पळपुटे अशीच नोंद होते, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी येथे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पार पडलेल्या शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात केलेल्या विधानावर अरविंद सावंत यांनी आज बुलढाण्यात प्रतिक्रिया दिली. शहरातील गर्दे वाचनालय सभागृहात ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्यावतीने तिसऱ्यांदा खासदार झाल्याबद्दल अरविंद सावंत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करीत शाब्दिक हल्ला चढविला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली होती. ‘उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभेत मिळालेले यश म्हणजे तात्पुरती आलेली सूज आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. यासंदर्भात विचारणा केली असता, सावंत यांनी ‘निर्लज्जम सदासुखी’ अशी उपमा दिली. ते (शिंदे) एवढे ताकदवान आहेत तर मग पळपुट्यारखे पळून का गेलेत, असा सवाल खासदार सावंत यांनी उपस्थित केला. यातही ते भाजपचीच सत्ता असलेल्या गुजरात, आसाम, गोवा राज्यामध्ये पळाले. पळपुटे हे पळपुटेच असतात आणि गद्दार हे गद्दारच असतात, याचे भान मुख्यमंत्री शिंदे यांनी ठेवावे, असा टोला सावंत यांनी लगावला. खंडोजी खोपडे यांनी शिवरायांशी गद्दारी आणि स्वराज्याशी बेईमानी केली. आज साडेतीनशे वर्षानंतरही खोपडे यांची गद्दारर म्हणूनच संभावना होते, असे सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा : पराभवासाठी शेतकऱ्यांचा रोष कारणीभूत….भाजप नेते म्हणतात, आम्ही चिंतन….

‘आमचे दरवाजे सर्वांसाठी बंद’

छगन भुजबळ हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेवर खासदार सावंत यांना विचारणा करण्यात आली. यावर ‘आमचे दरवाजे सर्वांसाठी बंद असल्याच्या’ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानाची सावंत यांनी आठवण करून दिली. त्यांनी सूचक विधान करून या विषयावर बोलण्याचे टाळले.

हेही वाचा : सुनील केदारांच्या विधानसभा उमेदवारीवर विघ्न? निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी स्वतः महाधिवक्ता…

‘स्वार्थ भावना असली तर माणसं आंधळी होतात’

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्याच्या भूमिकेवर विचारणा केली असता त्यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना असे वाटत होते की आम्ही त्यांच्यासोबत येऊ नये, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे, असा सल्ला सावंत यांनी दिला. स्वार्थ भावना असली तर माणसे आंधळी होतात, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.